पणजी
राजधानी पणजीत सद्यःस्थितीत ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत अनेक ठिकाणी काम सुरू असून, या कामांसाठी शहरातील बहुतांश रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे काम सुरू असल्याने नागरिकांची तारांबळ उडत आहे. रस्ते बंद असल्याने अनेकजण बुचकळ्यात पडत आहेत. वाहनचालक एकेरी मार्गाचा (वन वे) वापर करीत असले तरी काही वाहनचालक वन वे मधूनच विरुद्ध दिशेने वाहने घेऊन जात असल्याने वाहतूक नियमांचे ’तीन तेरा’ वाजत आहेत.
शहरातील एम. जी. रोड, 18 जून रोड, कॅफे भोसले येथील रस्ता, डी. बी. कुन्हा रस्ता, डॉ. शिरगावकर रस्ता, स्वामी विवेकानंद रोड, सांतिनेज, मिरामार, मळा आदी ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत काम सुरू असल्याने या ठिकाणची वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. नागरिकांना शहरात आल्यानंतर अनेक ठिकाणी दूरवर अंतरावर वाहने पार्क करून आपल्या कामासाठी जावे लागत आहे. बहुतांश रस्ते बंद असल्यामुळे लांब अंतरावरून नागरिकांना फेरफटका मारावा लागत आहे.
ज्या ठिकाणी काम सुरू आहे, त्या ठिकाणी वाहतूक पोलिसांकरवी कोणतेही नो एन्ट्रीचे फलक लावलेले नसल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत. पणजीत बाजारहाट व बारीक-सारीक कामांसाठी यायचे झाल्यास अनेक ठिकाणचे रस्ते बंद असल्याने नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. शिवाय 18 जून रस्ता, एम जी रोड या ठिकाणच्या व्यावसायिकांनाही ग्राहक मिळत नसल्याने याचा फटका व्यवसायावर बसत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. कोविड-19 नंतर व्यावसायिक आत्ताकुठेतरी सावरत असताना शहरात विविध विकासकामे सुरू झाल्याने याचा फटका व्यवसायावर झाल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
व्यावसायिकांना फटका…..
स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेली विकासकामे पूर्णत्वास येण्यास फेब्रुवारी उजाडण्याची शक्यता आहे. सुरू असलेल्या कामांना दिरंगाई झाल्यास ऐन नववर्षारंभास व्यावसायिकांना नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. मुख्य रस्त्यावर स्मार्ट सिटी अंतर्गत कामे सुरू असल्याने याचा फटका व्यवसायावर झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
या दुचाकीस्वारांना आवरणार कोण?……
शहरात कामे सुरू असल्याने काही वाहनचालक गोंधळतात खरे. पण, बंद रस्त्याचा फायदा घेऊन वन-वे रस्त्यातून (एकेरी मार्ग) विरुद्ध बाजूने वाहने घेऊन चालणाऱया दुचाकीस्वारांना आवरणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत कामे सुरू आहेत, त्याच ठिकाणी दुचाकी वाहनेही उभी करून वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जात आहे.
या कंपन्यांद्वारे सुरू आहे काम…
क्रिएटीव्ह इंटरप्रेनीयस एलएल पी, क्रेटा इंजिनिअरींग प्रा. लि., बकिया कन्स्ट्रक्शन या कंपन्यांद्वारे शहरात विविध ठिकाणी कामे सुरू आहेत. या कंपन्यांकडून प्रभागवार कामे सुरू असून, त्यापैकी क्रिएटीव्ह इंटरप्रेनीयस एलएल या कंपनीचे ठेकेदार मिरामार ते मळा या दरम्यान काम करीत आहेत. क्रेटा इंजिनिअरींग प्रा. लि., ही कंपनी डॉन बॉस्को स्कूल ते जुने न्यायालय तर बकिया कन्स्ट्रक्शन ही कंपनी सांतिनेज आदी परिसरातील काम करीत आहे.