Tarun Bharat

भक्तीने सिद्धी प्राप्त होते

Advertisements

अध्याय विसावा

वेदांचा उद्धवाला समजलेला सरळ अर्थ आणि त्यात गुणदोषांचे केलेले वर्णन ह्या गोष्टी उद्धवाच्या मनात घोटाळा उत्पन्न करत होत्या कारण भगवंतांनीच वेदात गुणदोषांचे वर्णन केले आहे आणि आता तेच उद्धवाला कुणाचेही गुणदोष पाहू नकोस असे सांगत होते. भगवंतांची ही परस्परविरोधी विधाने ऐकून उद्धव त्यांना म्हणाला, मला हे समजून घेणे अवघड वाटते आहे कृपया नीट समजावून सांगा. त्यावर भगवंत म्हणाले, माझ्या पूर्ण कृपेशिवाय माझ्या वेदवाणीचे आकलन होत नाही. वेदशास्त्रार्थामध्ये निष्णात होऊनही माझ्या प्रसादावाचून माझ्या वेदाचा अर्थ कळावयाचा नाही. ब्रह्मदेव चारही मुखाने वेद पढतो पण त्यालासुद्धा वेदार्थातील खरे रहस्य स्पष्टपणे समजत नाही, मग इतर बिचाऱयांची काय कथा? आता खरोखर माझ्या वेदाचा निर्धार तुला मी सांगतो. उद्धवा, नीट लक्ष देऊन श्रवण कर. ज्ञान, भक्ति आणि कर्म ही तीन कांडेच वेदाने सांगितलेली आहेत.

माझ्या वेदाची जी वाणी आहे, ती ह्या तीन योगांचंच प्रतिपादन करते. म्हणून उद्धवा! मोक्ष मिळण्याला दुसरा मार्गच नाही हे पक्के लक्षात ठेव. ते तीन योग कोणते? त्यांच्या अधिकाराचे विभाग कसे केले आहेत ते सविस्तर सांगतो. जे कोणी खरोखरच अंतःकरणापासून ब्रह्मलोकीच्या भोगापर्यंत विरक्त असतात, जे कोणी विधिपूर्वक व संकल्पयुक्त संन्यास घेऊन कर्माचा त्याग करतात, अशा अधिकाऱयांकरिता मी ‘ज्ञानयोग’ प्रकट केला आहे. त्या आत्मज्ञानाच्या साधनाने माझी सायुज्यता म्हणजे मद्रूपता प्राप्त होते. आता ह्या लोकात जे केवळ अविरक्त असतात, विषयासाठी कामासक्त झालेले असतात, त्यांच्यासाठी मी कर्मयोग प्रगट केला आहे. ह्याप्रमाणे उच्च आणि नीच म्हणजे श्रे÷ व कनि÷ असे दोन्ही अधिकारी मी तुला सुस्पष्ट सांगितले.

आता उत्कृष्ट व अलौकिक असा तिसरा एक अधिकारी आहे, तोही ऐक. जो मनुष्य अत्यंत विरक्तही नाही आणि अतिशय आसक्तही नाही, तसेच ज्याला पूर्वपुण्याईमुळे माझ्या कथा इत्यादीमध्ये श्रद्धा उत्पन्न झालेली असते, त्याला भक्तीयोगाने सिद्धी प्राप्त होते. हरीची कथा सारेच ऐकतात, पण सगळय़ांच्या मनात माझ्याबद्दल श्रध्दा उत्पन्न होत नाही. त्यातल्या एखाद्यालाच कथाश्रवणानेच माझ्याबद्दल विलक्षण श्रद्धा उत्पन्न होते. त्या श्रद्धेचे लक्षण ऐक. तो जे जे श्रवण करतो, त्याचे अनुसंधान त्याच्या हृदयात चालत असते. त्यामुळे मननही उत्साहयुक्त प्रेमाने होऊ लागते.

कथेची आवड अशी विलक्षण असते की, तिच्यामुळे मनामध्ये हर्ष अगदी दाटून येतो आणि हृदयात स्वानंदाची गुढीच उभारली जाते. त्यायोगे विषय हे दोषयुक्त असल्याचे दिसतात. त्यात मुख्यत्वेकरून स्त्री आणि धन हीच फार बाधक आहेत.

याकरिता जिव्हेला आणि जननेंद्रियाला आवरावे, हीच आठवण रात्रंदिवस मनात असावी. पायात बाणाचे टोक अडकून बसले, तर ते उपटून काढल्याखेरीज ती जखम नुसत्या उपचाराने कधीच बरी होत नाही त्याप्रमाणे विषयातील दोष विषय भोगून कधीच नष्ट व्हावयाचे नाहीत. मरण येत असलेले दिसले की, मनुष्य जसा थरथर कापू लागतो त्याप्रमाणे विषयभोग पाहिले की, खरा साधक थरथर कापू लागतो. ह्याप्रमाणे विषयात असलेले दोष तो निरंतर पाहात असतो पण ते पूर्णपणे टाकून देण्याचेही सामर्थ्य त्याच्या अंगात नसते. समज सेवकांनी राजाला बंदीत घातले आणि त्याला स्त्रीचंदनादिक विलास दिले, तर ते त्याला विषासारखे वाटतात. त्या भोगात तो उद्विग्नच राहतो.

तात्पर्य, भोग भोगीत असताना तो आपली सुटका कधी होईल म्हणून वाट पाहात असतो त्याप्रमाणे हाही विषय भोगीत असता रात्रंदिवस कंटाळलेला असतो. ह्याप्रमाणे जो विषयासक्तही नव्हे आणि विरक्तही नव्हे, अशा मधल्या स्थितीतला असेल, त्याच्याकरिताच मी वेदमुखाने भक्तिमार्ग दाखवून दिला आहे. अशांनी माझी भक्ति केली असता माझ्या स्वरूपावर त्यांचे प्रेम जडते, आणि आपोआपच विरक्ति प्राप्त होते. अशी ही माझी भक्ति सिद्धी प्राप्त करून देणारी आहे.

क्रमशः

Related Stories

आता तूच आहेस तुझ्या आरोग्याचा रक्षक!

Patil_p

अजरामर क्रांतिवीर!

Amit Kulkarni

मन उलगडताना…

Patil_p

बीपीसीएल चार्जिंग केंद्रांसाठी गुंतवणार 200 कोटी

Patil_p

आत्मनिर्भर अर्थसंकल्प

Patil_p

मोरूचे मित्र

Patil_p
error: Content is protected !!