Bharat Gawde selected for Komsap’s Literary Worker Award
कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग शाखेचा यावर्षीचा वाड:मयीन कार्यकर्ता पुरस्कार कोमसापच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी सलग तीन वर्ष असताना सर्वोत्कृष्ट कार्य केलेल्या भरत गावडे यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे वितरण रविवारी २९ जानेवारीला कोमसापच्या कुडाळ येथे होणाऱ्या फुल भाकरी कवि संमेलन व जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात मान्यवरांचा उपस्थितीत करण्यात येणार आहे.
भरत गावडे १९९९ पासून गेली २५ वर्षे कोमसापचे सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत असुन कोमसापच्या जिल्हा व तालुका शाखेच्या विविध साहित्यिक कार्यक्रमातही त्यांचा सक्रिय सहभाग असतो. विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांनी २०१३ पासून विद्यार्थी साहित्य संमेलने, लेखक आपल्या भेटीसाठी असे अनेक अभिनव उपक्रम राबविले. चौकुळ, माडखोल, कुडाळ, कुणकेरी, कोलगाव, दाणोली, सांगेली या ठिकाणी साहित्य संमेलने घेण्यात त्यानी महत्वाची भूमिका बजावली.
कोमसापच्या माध्यमातुन त्यांनी मराठी भाषा विकास कौशल्य, वक्तृत्व, वाचन संस्कृती, ग्रंथ प्रदर्शन, उपयोजित लेखन, कथाकथन व काव्य लेखन कार्यशाळा, पाठ्यपुस्तकातील लेखकांशी पत्र लेखनातून गाठी भेटी असे विविध उपक्रम राबविले.बॅरिस्टर नाथ पै, पुण्याश्लोक बापुसाहेब महाराज यांच्या जीवन चरित्रावर अनेक शाळांमध्ये व्याख्याने घेऊन त्यांच्या कार्याचा जागर केला. तसेच स्वखर्चाने पाच शाळांना सुधा मूर्ती यांची पुस्तके देऊन वाचन संस्कृती वाढविण्यासाठी नेहमीचं प्रोत्साहन दिले.
दाणोली वाचनालयाचे अध्यक्ष म्हणुन उत्कृष्ठ कार्य करताना निवृत्तीनंतरही शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रांत योगदान देत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. निवड समितीचे जिल्हाध्यक्ष मंगेश म्हस्के, सचिव विठ्ठल कदम, रुजारीओ पिंटो, सुरेश ठाकुर, वृंदा कांबळी, अँड संतोष सावंत यांनी ही निवड केली आहे.
ओटवणे प्रतिनिधी