Tarun Bharat

भारत जोडो यात्रेचा राजस्थानात प्रवेश

गेहलोत-पायलट यांच्या उपस्थितीत दिमाखात स्वागत

झालावाड / वृत्तसंस्था

राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वातील भारत जोडो यात्रा रविवारी मध्यप्रदेश सीमा ओलांडून राजस्थानला पोहोचली. मध्यप्रदेश-राजस्थान सीमेवर पायलट, गेहलोत यांच्यासह पक्षाच्या शेकडो नेत्यांनी घोषणांच्या निनादात ‘भारत जोडो’ यात्रेचे स्वागत केले. यात्रेच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री गेहलोत, सचिन पायलट यांच्यासह अनेक मंत्री झालावाडला पोहोचले होते. आता माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे वर्चस्व असलेल्या झालावाड येथून यात्रेला सुरुवात होणार आहे.

राजस्थानमध्ये ‘भारत जोडो’ यात्रा 18 दिवसात 520 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. या 18 दिवसांपैकी दोन दिवसांची विश्रांती वगळता उर्वरित दिवसात 520 किलोमीटरचे अंतर कापले जाणार आहे. ही यात्रा राजस्थानमधील प्रवेशानंतर रविवार, 4 डिसेंबरला राजस्थान-मध्यप्रदेश सीमेवरच मुक्कामासाठी थांबली होती. 5 डिसेंबर रोजी ही यात्रा 34.2 किलोमीटर चालणार आहे. त्यानंतर पुढील 14 दिवसांत राहुल गांधी 485 किलोमीटरचे अंतर कापतील. राजस्थानमधील शेवटच्या दिवशी 21 डिसेंबरला सकाळी ते 8 किलोमीटर चालत हरियाणात प्रवेश करतील. तत्पूर्वी 11 डिसेंबर रोजी राहुल गांधी 49.6 किलोमीटर चालणार आहेत. याशिवाय 6 डिसेंबरला 42.2 किलोमीटर आणि 19 डिसेंबरला 43.9 किलोमीटरचा प्रवास असेल. वरील तीन दिवस राहुल गांधींसह यात्रेत सहभागी काँग्रेस कार्यकर्ते 40 किलोमीटरहून अधिक अंतर चालणार आहेत. आतापर्यंत देशभरातील भारत जोडो यात्रेच्या तुलनेत राहुल गांधी राजस्थानमध्ये जास्त फिरणार आहेत.

झालावाड भाजपचा बालेकिल्ला

राजस्थानमधील भाजपचा बालेकिल्ला असलेल्या झालावाड जिह्यातून राजस्थानमधील भारत जोडो यात्रेला सुरुवात होणार आहे. येथील झालरापाटण विधानसभा मतदारसंघातून राजस्थानमध्ये प्रवेश केल्यानंतर ही यात्रा कोटा जिह्यात प्रवेश करेल. झालरापाटण हे माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे कार्यक्षेत्र मानले जाते.

Related Stories

अंतराळात मोठी दुर्घटना टळली

Patil_p

भारताने विमानोड्डाणे पुन्हा सुरू करावीत!

Patil_p

जबरदस्तीने धर्मांतर केल्यास उत्तराखंडमध्ये 10 वर्षे शिक्षा

Amit Kulkarni

बंगालच्या दोन खासदारांना वाय प्लस सुरक्षा

Patil_p

लष्करातील शीख सैनिकांना बंडासाठी चिथावणीचा प्रयत्न

Patil_p

दिल्लीत शुक्रवारी मागील 14 वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद

Tousif Mujawar