ऑनलाईन टीम/तरुण भारत
Bharat Jodo Yatra in Nanded: राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची ‘भारत जोडो यात्रा’ (Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेला दिवसागणिक वाढता प्रतिसाद मिळत आहे. नांदेडमध्ये (Nanded) असताना राहुल गांधी यांना दोन मुलांनी सॉफ्टवेयर इंजीनियर व्हायचे बोलून दाखवले पण आपण आजपर्यंत संगणक पाहिला व आपल्या शाळेतही नसल्याचे सांगितले. शाळेत संगणकच नाही तर या मुलाचे स्वप्न कसे पूर्ण होणार हे जाणून राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या मुलाला लॅपटॉप भेट दिला. आता या मुलाच्या स्वप्नाला बळ मिळाले. पण ही एका मुलाची गोष्ट झाली, हिंदुस्थानमधील प्रत्येक मुलाचे स्वप्न साकार करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात असताना काही शाळकरी मुलंही भारत जोडो यात्रेत सहभागी झाली होती. राहुल गांधी यांनी मुलांशी संवाद साधला. त्यांचे प्रश्न जाणून घेतले. त्याचवेळी सर्वेश हातने हा मुलगाही त्यांना भेटला. त्यानं राहुल गांधी यांना साॅफ्टवेअर इंजिनीअर होण्याची इच्छा बोलून दाखवली, परंतु आजपर्यंत त्यानं संगणक पाहिला नव्हता. त्यांच्या शाळेतही संगणक नाही असं मुलानं सांगितलं. हा किस्सा राहुल गांधी यांनीच गुरुवारी नांदेड इथं झालेल्या जाहीर सभेत सांगितला होता.
राहुल गांधी यांनी हा किस्सा सांगितल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सर्वेशची माहिती घेतली व आज सकाळी राहुल गांधी यांच्याच उपस्थितीत त्याला नवाकोरा लॅपटॉप भेट दिला. या भेटीनं सर्वेशचा आनंद गगनात मावेनासा झाला. काँग्रेसनं दिलेल्या या मदतीमुळं छोट्या सर्वेशचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री अशोक चव्हाण हे देखील यावेळी उपस्थित होते.