बांबवडे कुस्ती मैदान; भारत मदनेकडून सलग तीन वेळा कब्जा घेण्याचा अयशस्वी प्रयत्न
पलूस प्रतिनिधी
गेल्या आठवडाभर कोसळणाऱ्या आभाळाने आज दम धरला होता तर मैदानावर घामाने चिंब झालेल्या मल्लांना दम भरला होता. क्षणोक्षणी कुस्ती शौकिनांची उत्कंठा वाढवणाऱया बांबवडे कुस्ती मैदानात पंढरपूरच्या महान भारत केसरी माऊली जमदाडेने पुण्याच्या महाराष्ट्र केसरी पै. भारत मदनेवर तब्बल तेवीस मिनिटांनी एकहाती घिस्सा डावावर विजय मिळवला. अन् कुस्ती शौकिनांच्या डोळयाचे पारणे फेडले. टाळयांचा कडकडाटासह हालगीच्या निनादाने मैदानातील उपस्थित ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण आले.
कुस्तीची परंपरा लाभलेले बांबवडेचे कुस्ती मैदान होणार नाही असे घोषीत झाले होते. मात्र ग्रामस्थ व काही स्थानिकांच्या पुढाकाराने कमी वेळेत तयारी करून मैदान भरवण्याचा निर्णय झाला. ग्रामस्थांचा प्रतिसाद व निसर्गाने साथ दिल्यामुळे मैदानाने कुस्तीची परंपरा अखंडीत सुरू ठेवण्यात यश आले. पलूस तालुक्यातील बांबवडे गावात देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कुस्ती मैदान भरविण्याची परंपरा आहे. पाऊसामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात हे कुस्ती मैदान होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र बांबवडे ग्रामस्थांच्या वतीने मैदान यशस्वीपणे पार पडले. सोमवारी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजीत कुस्ती मैदानास दुपारी उत्साहात प्रारंभ झाला.
कुस्ती मैदानचे उद्घाटन जयभवानी उद्योग समुहचे प्रकाश भाऊ पाटील, अविनाश जाधव, फिरोज मुल्ला, ताहेर मुल्ला, दादासाहेब भंडारे, यशवंत पवार, प्रमोद जाधव, जयंत पाटील, सुधीर जाधव यांच्या हस्ते झाले. प्रथम क्रमांकाची कुस्ती खासदार संजय पाटील, संग्राम देशमुख यांच्याहस्ते लावण्यात आली. यामध्ये पंढरपूरचा भारत केसरी पै. माऊली जमदाडे विरूध्द पुण्याचा महाराष्ट्र केसरी पै. भारत मदने यांच्यातील सामना रंगला. सुरूवातीपासूनच दोघेही एकमेकांना भारी पडत होते. सुरूवातीच्या पाचव्या मिनिटांत भारत मदने याने माऊलीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला तो माऊलीने मोठया शिताफीने परतून लावला. पुन्हा पंचांनी दोघांना मैदानच्या मध्यभागी घेवून कुस्ती जोडली. दहाव्या मिनिटांनी पुन्हा भारत मदने याने माऊलीवर ताबा घेण्याचा प्रयत्न केला हा क्षण पाहताना कुस्ती शौकीनांची उत्कठा वाढत होती. शेवटी ही कुस्ती बरोबरीत सुटेल असे चित्र दिसून येताच कुस्ती शौकीनांच्यातून ही कुस्ती निकाली व्हावी अशी मागणीने जोर धरला. अखेर ही कुस्ती निकालीच झाली. अन् तब्बल तेवीस मिनिटांनी माऊली जमदाडे ने भारत मदनेला एकहाती घिस्सा डावावर आस्मान दाखवून प्रथम क्रमांकाच्या पाच लाख रूपये इनामाचा मानकरी ठरला.
या मैदानातील वैभव रास्कर विरूध्द बाळू अपराध व्दितीय क्रमांकाची तीन लाख इनामाची कुस्ती बरोबरीत सोडविली. तर तृतीय क्रमांकाच्या कुस्तीसाठी एक मल्लास जोड नसल्याने कुस्ती रद्द करण्यात आली. त्यामुळे कुस्ती शौकीनांच्यात काहीशी निराशा आली.
स्वातंत्र्य दिनानिमित्ताने भरविलेल्या बांबवडे कुस्ती मैदानात खासदार संजयकाका पाटील, पृथ्वीराज देशमुख, संग्राम देशमुख, अभिजीत पाटील, महेंद्र लाड, जे. के. बापू जाधव, विनय कोरे यांचे चिरंजीव विश्वेश कोरे, राजू शेट्टी यांचे चिरंजीव सौरव शेट्टी, संदीप राजोबा, पोपटराव मोरे, पै. किरण भगत यांनी उपस्थित राहून मैदानाची शान वाढवली.
सोमवारी झालेल्या कुस्ती मैदानात पै. संजय पाटील, विशाल मोन, सुरेश ऐडके, पै. भरत पवार, अक्षय माळी, अक्षय जाधव, वैभव पाटील, ओंकार पाटील, किरण सिसाळ, विक्रम चव्हाण यांच्यासह दोनशेहून अधिक लहान मोठया चटकदार कुस्त्या झाल्या. यामध्ये व्यक्तीगत दिडशे कुस्त्या लावल्या. मुंबईचे कलाम शेठ, मिरजचे महाराष्ट्र रेट बागवान साहेब, आर. जे. ज्वेलर्स, डॉ. खंबाळकर, सावंत स्टील बांबवडे, सांगलीचे स्टील व्यवसायिक नासिरशेठ बागणीकर साताऱयाचे उद्योगपती अझिम भालदार, अलिबागचे नगराध्यक्ष गजानन बुंदके, रत्नागिरीचे उदयोजक मोरे यांनी मैदानासाठी मोलाचे योगदान दिले. स्वानंद पाटील, राहुल संकपाळ, महेश पाटील, परिमल पाटील, पोपट पवार यांच्यासह कुस्ती मंडळाच्या कार्यकत्यांनी मैदानाचे नेकटे संयोजन केले.