नवी दिल्ली : भारती एअरटेलची सहयोगी कंपनी भारती दूरसंचार जवळपास 12,895 कोटी रुपयांमध्ये सिंगटेल कंपनीची 3.33 टक्क्यांची हिस्सेदारी खरेदी करणार असल्याची माहिती आहे. उपलब्ध माहितीनुसार हा व्यवहार आगामी 90 दिवसांच्या कालावधीत पूर्ण करण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. भारती टेलिकॉम (बीटीएल)ची मालकी भारती समूहाचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांच्याकडे आहे.
भारती एअरटेलने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार सिंगटेल आणि त्याची अन्य हिस्सेदारी जवळपास 2.25 अब्ज सिंगापूर डॉलरच्या एकूण रक्कमेच्या जवळपास 3.33 टक्के समभाग बीटीएल यांना हस्तांतरित करण्यासाठी एक करार केला आहे. यानंतर एअरटेलमध्ये सिंगटेल आणि भारतीची प्रत्यक्ष हिस्सेदारी क्रमशः जवळपास 10 टक्के आणि सहा टक्के इतकी होणार आहे. सदरच्या व्यवहारानंतर आगामी काळात भारती आणि सिंगटेल कंपनी यांनी आपली एअरटेलमधील हिस्सेदारी कायम ठेवण्यासाठी एकत्र काम करण्यावर सहमती दर्शवली असल्याची माहिती आहे.