विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच महाप्रसादाने होणार सांगता : लाभ घेण्याचे भाविकांना आवाहन
प्रतिनिधी/ येळ्ळूर
राजहंसगडाच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या सुळगे (ये) गावामध्ये श्री भावकेश्वरी देवस्थान हे एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. नवसाला पावणारे हे देवस्थान असल्यामुळे सुळगा गावासह परिसरातील भाविक नेहमीच या मंदिराला भेट देतात. आता भव्य असे मंदिर बांधले आहे. त्या ठिकाणी नुकतीच आणलेल्या भावकेश्वरी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, वास्तूशांती, कळसारोहण, लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात करण्यात येणार आहे.
रविवार दि. 26 रोजी ग्रामदेवतेला जलाअभिषेक घालण्यात येणार आहे. सोमवार दि. 27 रोजी सकाळी 9 वाजता मूर्ती प्रतिष्ठापना, कळसारोहण, सकाळी 10 वाजता होमहवन, रात्री 9 वाजता भारुडी भजनाचा कार्यक्रम आहे. मंगळवार दि. 28 रोजी सकाळी 8 वाजता अभिषेक, सकाळी 9 वाजता देवीची ओटी भरणे, सकाळी 11 वाजता मंदिराचे उद्घाटन व सत्कार समारंभ, दुपारी 1 वाजता महाप्रसाद व रात्री 8 वाजता मंदिरासमोर सामुदायिक आरती करण्यात येणार आहे.
यमकनमर्डी येथून भावकेश्वरी देवीची मूर्ती आणली आहे. ग्रामस्थांनी अत्यंत आकर्षक मंदिराची उभारणी केली असून, त्यासाठी 80 लाख रुपये खर्च केले आहेत. माहेरवासिनी, पाहुणे मंडळीसह सर्वच जण या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत.
सर्वांच्या श्रद्धेचे असलेली ही देवीच्या प्रतिष्ठापनेसाठी सारे सज्ज झाले आहेत. श्री भावकेश्वरी देवी मंदिर जीर्णोद्धार मंडळाने गेल्या तीन वर्षांपासून यासाठी मोठे कष्ट केले आहेत. सर्व ग्रामस्थ, युवक मंडळांनी उत्सवाची सर्व तयारी केली असून तालुक्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.