जोधपूर / वृत्तसंस्था
लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत भिलवारा किंग्ज संघाने शुक्रवारी झालेल्या सामन्यात गुजरात जाएंटसचा 5 गडय़ांनी पराभव करत या स्पर्धेच्या प्लेऑफ गटातील आपले स्थान निश्चित केले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात जाएंटसने 20 षटकात 7 बाद 186 धावा जमविल्या. त्यानंतर भिलवारा किंग्जने 19.4 षटकात 5 बाद 187 धावा जमवित विजय नोंदविला.
गुजरात जाएंटसच्या डावामध्ये सिमन्सने 22 धावा जमविल्या. पार्थिव पटेल 1 तर केव्हिन ओब्रायन 4 धावावर बाद झाले. यशपाल सिंगने 37 चेंडूत 58 धावा झळकविल्या. ख्रिस गेलने 23 चेंडूत अर्धशतक झळकविले. गेलने युसुफ पठाणच्या एका षटकामध्ये 2 षटकार आणि 3 चौकार ठोकले. गेलने 40 चेंडूत 68 धावा झळकविल्याने गुजरात जाएंटसला 186 धावापर्यंत मजल मारता आली. भिलवारा किंग्जच्या युसुफ पठाणने 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल भिलवारा किंग्जच्या डावामध्ये सलामीच्या जोडीने 57 धावांची भागिदारी केली. व्हॅनवेकने 26 धावा जमविल्या. पोर्टरफिल्डने 37 चेंडूत 40 धावा झळकविल्या. युसुफ पठाणने आक्रमक फटकेबाजी करताना केवळ 18 चेंडूत 4 षटकार आणि 1 चौकारांसह 39 धावा झोडपल्या. जेसल केरियाने 24 चेंडूत नाबाद 39 धावा जमविल्या. इरफान पठाणने 14 चेंडूत नाबाद 26 धावा जमविला. या स्पर्धेत इंडिया कॅपिटल्स आणि भिलवारा किंग्ज या दोन्ही संघांनी प्लेऑफ गटातील आपले स्थान निश्चित केले असून या दोन्ही संघांनी प्रत्येकी समान सात गुण मिळविले आहेत. प्लेऑफ गटातील तिसऱया स्थानासाठी गुजरात जाएंटस् आणि मणिपाल टायगर्स यांच्यात चुरस निर्माण झाली आहे.