50 बेडच्या अतिदक्षता विभागाच्या बांधकामाचा शुभारंभ
प्रतिनिधी /बेळगाव
बिम्सच्या आवारात आरोग्य आणि कुटुंब कल्याण अभियांत्रिकी विभागातर्फे उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयाचा भूमिपूजन कार्यक्रम मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या हस्ते पार पडला. आमदार अनिल बेनके यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.
100 बेडचे माता व शिशू रुग्णालय आणि 50 बेडच्या अतिदक्षता विभागाच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री बोम्माई यांनी हे रुग्णालय ग्रामीण भागातील जनतेलादेखील उत्तम सेवा देईल, असे सांगितले. यावेळी आमदार अनिल बेनके म्हणाले, बेळगाव बिम्स रुग्णालयात उत्तम सेवा दिली जात आहे. त्यामुळे ते 12 व्या क्रमांकावर आले आहे. याठिकाणी 1200 हून अधिक रुग्ग्णांना एकाचवेळी उपचार करण्याची सुविधा आहे. या रुग्णालयात 650 अतिरिक्त बेडच्या बांधकामाला परवानगी द्यावी, अशी मागणीदेखील बेनके यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
यावेळी पालकमंत्री गोंविद कारजोळ, आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री डॉ. के. सुधाकर, मंत्री शशिकला जोल्ले, प्रादेशिक आयुक्त के. पी. मोहनराज, जिल्हाधिकारी नितेश पाटील, बिम्सचे संचालक अशोक शेट्टी, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कौजलगी आदी उपस्थित होते.