वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या आगामी होणाऱया अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भारताचा माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू तसेच कर्णधार बायचुंग भुतियाने शुक्रवारी आपला अर्ज दाखल केला आहे.
अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या अध्यक्षपदाच्या रिंगणामध्ये भारताचा माजी फुटबॉलपटू कल्याण चौबे अध्यक्षपदासाठी आघाडीचा स्पर्धक म्हणून ओळखला जातो. आता भुतिया आणि चौबे यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. बायचुंग भुतियाने फेडरेशनच्या अध्यक्षपदासाठीचा आपला अर्ज अधिकृतपणे दाखल करताना त्याच्यासमवेत दीपक मोंडल व मधुकुमारी उपस्थित होते. दीपक मोंडल आणि मधुकुमारी यांनी बायचुंग भुतियाला अनुमोदन दिले आहे. देशातील अव्वल फुटबॉलपटूंचा प्रतिनिधी म्हणून हा अर्ज दाखल करत असल्याचे बायचुंग भुतियाने म्हटले आहे. दिल्ली फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष शाजी प्रभाकरन यांनीही अध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
अ. भा. फुटबॉल फेडरेशनच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये आता माजी फुटबॉलपटू युगेनसेन लिंगडोह यांनी मेघालय फुटबॉल संघटनेतर्फे तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे बंधू अजित बॅनर्जी यांनीही आपला अर्ज दाखल केला आहे. लिंगडोह हे सध्या मेघालय विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत. अध्यक्षपदासाठीची अर्ज भरण्याची मुदत शुक्रवारी समाप्त झाली आहे. कल्याण चौबे हा भारताचा माजी गोलरक्षक असून त्याने मोहन बागान आणि ईस्ट बंगाल या क्लबचे प्रतिनिधित्व केले होते. तो सत्ताधारी भाजपचा सदस्य आहे. त्यामुळे गुजरातच्या फुटबॉल संघटनेतर्फे चौबेला अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी अनुमोदन देण्यात आले आहे.