25 होतकरू विद्यार्थिनींना मिळाल्या सायकली
प्रतिनिधी /बेळगाव
रोटरी क्लब ऑफ साऊथतर्फे रविवारी बेळगाव शहर व परिसरातील गरीब व होतकरू विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या हस्ते विद्यार्थिनींना सायकलचे वितरण करण्यात आले. नर्तकी चित्रपटगृह येथे 25 सायकलचे वितरण झाले.
शहर परिसरातील गरीब मुलींना शाळेपर्यंत पोहचण्यासाठी रिक्षा व बससाठी पैसे खर्च करावे लागतात. अशा मुलींना सायकल उपलब्ध करून देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ पुढे सरसावली. पिरनवाडी येथील केएलएस पब्लिक स्कूल, जी. जी. चिटणीस स्कूल, बालिका आदर्श विद्यालय, स्वाध्याय विद्यामंदिर, टिळकवाडी हायस्कूल व टिळकवाडी येथील केएलएस स्कूलच्या विद्यार्थिनींना सायकल देण्यात आल्या. आई-वडिलांची मेहनत सार्थकी लावा, असे सचिन पिळगावकर यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधताना सांगितले.
यावेळी रोटरीचे माजी प्रांतपाल अविनाश पोतदार, रोटरी क्लब ऑफ साऊथचे अध्यक्ष अशोक नाईक, माजी प्रांतपाल आनंद कुलकर्णी, सेपेटरी संतोष हत्तरकी, सतीश कुलकर्णी, विरेन कुलकर्णी, रवी करलिंगण्णावर, उदय जोशी, अनिल कुटे, रमेश रामगुरवाडी यासह इतर सदस्य उपस्थित होते.