सेन्सेक्स निर्देशांक 900 अंकांनी कोसळला, ऑटो निर्देशांक नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक बाजारांमध्ये नकारात्मकतेच्या वातावरणात भारतीय शेअर बाजार सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी मोठय़ा घसरणीसह बंद झाला. रुपयाची नीचांकी घसरण व विक्रीवर दिसलेला जोर याचा परिणाम बाजारावर नकारात्मक दिसला
सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 953 अंकांनी घसरुन 57,145.22 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकही 311 अंकांनी कोसळत 17,016.30 अंकांवर बंद झाल्याचा पाहायला मिळाला. जागतिक बाजारातील कमकुवत स्थितीमुळे भारतीय शेअर बाजार सोमवारी मोठय़ा प्रमाणात कोसळल्याचे दिसून आले. इंट्रा डे दरम्यान सेन्सेक्स निर्देशांक 700 अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत होता तर निफ्टी निर्देशांकाने 16,978 अंकांची नीचांकी पातळी गाठली होती. सेन्सेक्समधील 26 समभागांमध्ये घसरणीचा कल राहिला होता.
राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) ऑटो, धातू, सार्वजनिक बँका, रियल्टी व मीडिया क्षेत्राचे निर्देशांक 3 टक्के इतके घसरले होते. मिडकॅप व स्मॉलकॅपनेही 3 टक्के घसरण अनुभवली होती. डॉलरच्या तुलनेत रुपयाही मोठी घसरण नोंदवत 81.55 वर विक्रमी नीचांकी स्तरावर आला होता.
3 दिवसात 6.8 लाख कोटी साफ
गेल्या आठवडय़ात शेवटचे तीनही दिवस शेअरबाजार नुकसानीसह बंद झाला होता. बाजाराकडून मिळालेल्या माहितीनुसार 3 दिवसात गुंतवणूकदारांना 6.8 लाख कोटी रुपयांचे नुकसान झेलावे लागले. बाजाराच्या घसरणीत रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी, बजाज व टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांनीही घसरणीस हातभार लावला. यात हिंदुस्थान युनिलिव्हरचा समभाग मात्र चमकताना दिसला.
दुसरीकडे हर्षा इंजिनियर्सचा समभाग सोमवारी शेअर बाजारात लिस्ट झाला. अमेरिकेतील नॅसडॅक 198 अंकांनी घसरणीत होता.