अर्थव्यवस्थेला वेग येण्याची सुचिन्हे ः तज्ञांचे मत
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पायाभूत सुविधांशी संबंधित असणाऱया आठ महत्वपूर्ण उद्योगक्षेत्रांच्या विकास दरात नोव्हेंबर महिन्यात वाढ झाली आहे. या महिन्यात हा विकासदर 5.4 टक्के इतका राहिला आहे. गेल्या वर्षीच्या याच महिन्यात तो केवळ 3.2 टक्के होता. शुक्रवारी या संबंधीची अधिकृत माहिती सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आली.
ऑक्टोबर 2022 या महिन्यात हा विकास दर अवघा 0.9 टक्के इतका होता. त्या तुलनेत त्याच्या पुढील महिन्यात, अर्थात नोव्हेंबरमध्ये ही वाढ मोठी मानली जात आहे. कोळसा, कच्चे इंधन तेल, नैसर्गिक वायू, तेलशुद्धिकरण, नैसर्गिक वायू, खते, पोलाद आणी वीज अशी ही आठ क्षेत्रे आहेत. एप्रिल ते ऑक्टोबर या आठ महिन्यांच्या कालावधीत हा विकास दर 8.0 टक्के इतका राहिला आहे. मात्र, गेल्यावर्षीच्या याच आठ महिन्यांच्या कालावधीत विकासदर 13.9 टक्के होता. त्या तुलनेत यंदाचा आठ महिन्यांमधील विकासदर कमी आहे.
कोळसा उत्पादनात वाढ
कोळसा उत्पादनात नोव्हेंबर महिन्यात वाढ झाली असून वाढदर 12.3 टक्के आहे. याशिवाय खतांचे उत्पादन 6.4 टक्क्यांनी तर पोलादाचे उत्पादन 10.8 टक्क्यांनी वाढले आहे. कच्चे इंधन तेल, नैसर्गिक वायू आणि तेलशुद्धीकरण उत्पादने यांच्या उत्पादनवाढीचा दर मात्र कमी झाला आहे. सीमेंटचे उत्पादन 28.6 टक्के तर वीजेचे उत्पादन 12.3 टक्क्यांनी वाढले आहे.