एप्रिलमध्ये 24 टक्क्यांची मोठी वाढ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने मंगळवारी निर्यातीची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. पेट्रोलियम उत्पादने, इलेक्ट्रॉनिक सामग्री आणि रसायन यासारख्या क्षेत्रांच्या उत्तम कामगिरीमुळे एप्रिल महिन्यात निर्यात मागील वर्षाच्या तुलनेत 24.22 टक्क्यांनी वाढून 38.19 अब्ज डॉलर्सवर पोहोचल्याचे वाणिज्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. यापूर्वी मार्च महिन्यातही निर्यातीत मोठी वाढ नोंदविली गेली होती.
सरकारकडून प्रसिद्ध आकडेवारीनुसार एप्रिल महिन्यात आयात देखील 26.55 टक्क्यांनी वाढून 58.26 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. याचबरोबर एप्रिल महिन्यातील व्यापार तूट देखील वाढली असून त्याचा आकडा 20.07 अब्ज डॉलर्सवर गेला आहे. मागील वर्षाच्या एप्रिल महिन्यात हा आकडा 15.29 अब्ज डॉलर्स राहिला होता.
मागील अनेक महिन्यांपासून देशाच्या आयात-निर्यातीत वाढ दिसून येत आहे. देशातून होणाऱया निर्यातीत मार्च महिन्यात 19.76 टक्क्यांची वाढ झाली होती आणि मागील वर्षाच्या तुलनेत वाढून 42.22 अब्ज डॉलर्सवर पोहोचली होती.
मार्च 2021 मध्ये देशामधून एकूण 35.26 अब्ज डॉलर्सची निर्यात झाली होती. याचबरोबर मार्चमध्ये आयात 24.21 टक्क्यांनी वाढून 60.74 अब्ज डॉलर्सवर पोहोचली होती. तर व्यापारी तूट 18.51 अब्ज डॉलर्स इतकी राहिली होती.
चालू वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात देशाची निर्यात 25.1 टक्क्यांनी वाढून 34.57 अब्ज डॉलर्सवर पोहोचली होती. परंतु यादरम्यान व्यापारी तूट देखील वाढून 20.88 अब्ज डॉलर्सवर गेली होती. याचबरोबर आयातीत 36 टक्क्यांची वाढ होत हा आकडा 55.45 अब्ज डॉलर्स राहिला होता.
मेक इन इंडिया मोहिमेमुळे भारतातून होणारी निर्यात वाढत आहे. सरकारकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे चित्र आहे. तर आत्मनिर्भर भारत मोहिमेच्या अंतर्गत देशाची गरज देशातच भागविण्यासाठी उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. या उत्पादनाकरता कच्चा माल आयात केला जात असल्याने आयातीचा आकडा देखील वाढत चालला आहे.