ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात केली आहे. दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर 198 रुपयांनी स्वस्त झाला आहे. कोलकातामध्ये 182, मुंबईत 190.50, तर चेन्नईमध्ये 187 रुपयांनी सिंलिंडरचे दर कमी झाले आहेत. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही.
दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 2219 रुपयांना मिळत होता, तो आता तो 2021 रुपयांना मिळेल. कोलकातामध्ये 2140 रुपयांना, मुंबईत 1981 रुपयांना, तर चेन्नईमध्ये 2186 रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी 1 जून रोजी व्यावसायिक सिलिंडर 135 रुपयांनी स्वस्त झाले होते. गेल्या महिनाभरात व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 300 रुपयांहून अधिक कपात झाली आहे. मे महिन्यात सिलिंडरचे दर 2354 रुपयांपर्यंत वाढले होते.
घरगुती गॅस सिलिंडरमध्ये तेल कंपन्यांकडून कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. 19 मे रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत अखेरचा बदल करण्यात आला होता. सध्या दिल्लीत 14.2 किलोचा गॅस सिलिंडर 1003 रुपयांना मिळत आहे.