वृत्तसंस्था/ अहमदाबाद
भारतीय महिलांच्या लिग फुटबॉल स्पर्धेत विद्यमान विजेत्या गोकुळम केरळ एफसी संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. येथे झालेल्या सामन्यात गोकुळम केरळ संघाने माता रुक्मिणी एफसी संघाचा 9-0 अशा गोलफरकाने पराभव केला. या विजयामुळे गोकुळम केरळ एफसी संघाने उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले आहे. त्यांनी या स्पर्धेत सहा सामन्यातून 16 गुणासह आघाडीचे स्थान मिळवले आहे. तर त्यांनी आतापर्यंत एकही सामना गमवलेला नाही.
हा सामना एकतर्फीच झाला. या सामन्यात गोकुळम केरळ संघातील नेपाळची आंतरराष्ट्रीय महिला फुटबॉलपटू सबित्रा भंडारीने दर्जेदार कामगिरी करताना 4 गोल नोंदवल्याने तिला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. गोकुळम केरळ संघातील इंदुमती केथीरसेन 2 तर एस. रंजना चानू, डी. ग्रेस, हेमाम सिल्की देवी यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. अ गटातील या सामन्यात माता रुक्मिणी संघाला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही.