वृत्तसंस्था/ पाटणा
राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात पदक मिळविलेल्या बिहार राज्यातील खेळाडूंना राज्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अ दर्जाची नोकरी देण्याची घोषणा केली आहे.
पाटलीपुत्र क्रीडा संकुलात 18 व्या राष्ट्रीय आंतरजिल्हा कनिष्ठच्या ऍथलेटिक्स स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ही घोषणा केली आहे. यापूर्वी क्रीडा क्षेत्रात दर्जेदार कामगिरी करत पदक मिळविणाऱया राज्यातील खेळाडूंना शासनातर्फे क दर्जाच्या नोकऱया उपलब्ध करून देण्यात येत असत. पण आता यापुढे पदक विजेत्या खेळाडूंना अ दर्जाच्या नोकऱया उपलब्ध करून देण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी आपल्या घोषणेत म्हटले आहे. 2012 पासून बिहार शासनाने राज्यातील 235 पदकविजेत्या खेळाडूंना शासकीय नोकऱया उपलब्ध करून दिल्या आहेत. बिहार शासनातर्फे राजगीरमधील क्रीडा विद्यापीठाच्या संकुलात आंतरराष्ट्रीय स्टेडियमची उभारणी केली जाणार असून या प्रकल्पासाठी यापूर्वीच 740 कोटी रुपये मंजूर केले आहेत. बिहारमध्ये पहिल्यांदाच 18 वी राष्ट्रीय आंतरजिल्हा कनि÷ ऍथलेटिक्स स्पर्धा भरविली गेली आहे. सदर स्पर्धा 12 फेब्रुवारीला संपणार आहे. या स्पर्धेमध्ये राज्यातील सुमारे 600 खेळाडू सहभागी झाले आहेत.