Tarun Bharat

अपहरणाचा आरोपी बिहारचा कायदामंत्री

Advertisements

कल्पनाच नसल्याचा मुख्यमंत्री नितीश कुमारांचा युक्तिवाद

वृत्तसंस्था/ पाटणा

बिहारच्या महाआघाडी सरकारमध्ये कायदामंत्री म्हणून नियुक्ती झालेले राजदचे कार्तिकेय सिंह उर्फ मास्टर कार्तिक वादात सापडले आहेत. बाहुबली नेते अनंत सिंह यांचे निकटवर्तीय मास्टर कार्तिक हे 2014 मधील एका अपहरणाप्रकरणी आरोपी आहेत. स्थानिक न्यायालयाने त्यांच्या अंतरिम जामीन अर्जावर सुनावणी करत 1 सप्टेंबरपर्यंत त्यांना दिलासा दिला आहे.

तर याप्रकरणी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यासंबंधीची माहिती नसल्याचा युक्तिवाद केला आहे. भाजपने हा मुद्दा उचलून धरत नव्या सरकारमध्ये जंगलराज परतत असल्याचा आरोप केला आहे. 2014 मध्ये अनंत सिंह यांच्यासोबत कार्तिकेय आणि अन्य काही जणांनी बिहटा येथे राजू सिंह यांचे अपहरण केले होते. याप्रकरणी कार्तिकेय यांनाही आरोपी करण्यात आले आहे. अपहरण प्रकरणी कार्तिकेय सिंह यांच्या विरोधात वॉरंट काढण्यात आले होते. त्यांना न्यायालयासमोर शरणागती पत्करावी लागणार होती. परंतु याचदरम्यान 10 ऑगस्ट रोजी महाआघाडी सरकार अस्तित्वात आले. दोन दिवसांनी म्हणजेच 12 ऑगस्ट रोजी कार्तिकेय सिंह यांना एक सप्टेंबरपर्यंत अटकेपासून दिलासा मिळाला. त्यानंतर 16 ऑगस्ट रोजी कार्तिकेय यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यांना कायदामंत्री करण्यात आले.

बाहुबलींचे सरकार

कार्तिकेय यांच्यावरील आरोपाची माहिती समोर येताच विरोधी पक्ष असलेल्या भाजपने जोरदार टीका चालविली आहे. नव्या सरकारमध्ये जंगलराज परतत आहे. महाआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात बाहुबलींना अधिक स्थान देत नितीश कुमार यांनी बिहारमध्ये भीतीदायक दिवसाची वापसी निश्चित केली आहे. सुरेंद्र यादव, ललित यादव, रमाकांत यादव आणि कार्तिकेय यासारख्या आमदारांना मंत्री करण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात शस्त्र बाळगणे, लैंगिक शोषण, हत्येचा प्रयत्न तसेच अपहरणासारखे गंभीर गुन्हे नोंद असल्याचा दावा भाजप नेते सुशील कुमार मोदी यांनी केला आहे.

बाहुबलीचे निकटवर्तीय कार्तिकेय सिंह उर्फ मास्टर कार्तिक हे विधान परिषद सदस्य आहेत. बाहुबली अनंत सिंह यांचे निकटवर्तीय मानले जाणारे कार्तिकेय 2020 च्या विधानसभा निवडणुकीवेळी राजदमध्ये सामील झाले होते. त्यांच्या विरोधात अनेक ठिकाणी विविध गुन्हे नोंद आहेत.

error: Content is protected !!