बांदीपोरा येथे अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळय़ा
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिह्यातील सदुनारा गावात मध्यरात्रीनंतर अज्ञात हल्लेखोरांनी एका मजुराची गोळय़ा झाडून हत्या केली. हा मजूर बिहारमधील मधेपुरा जिल्हय़ातील रहिवासी आहे. मोहम्मद अमरेज (19 वर्षे) असे त्याचे नाव आहे. या घटनेनंतर पोलिसांकडून परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, हल्लेखोर सापडू शकले नाहीत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या मजुराच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
काश्मीरमध्ये बिहारमधील एका मजुराची हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. मध्यरात्रीनंतर हा हल्ला झाल्याचेही सांगण्यात आले. अमरेज याच्यावर हल्ला झाल्यानंतर तो रक्ताच्या थारोळय़ात पडला होता. त्याला रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, असे काश्मीर झोन पोलिसांनी ट्विटरवर स्पष्ट केले आहे. अमरेजच्या निकटवर्तियांनी हल्ल्याची माहिती देताना मध्यरात्री 12ः20 च्या सुमारास गोळय़ांचा आवाज आल्याचे सांगितले. आम्ही घरात झोपलो असताना माझ्या धाकटय़ा भावाने मला उठवत काही गोळय़ा झाडल्या गेल्याची माहिती दिल्याचे अमरेजचा भाऊ म्हणून ओळख देणारे मोहम्मद ताम्हीद यांनी सांगितले. या हल्ल्यानंतर घराबाहेर पडल्यानंतर अमरेज रक्ताच्या थारोळय़ात पडलेला दिसला. आम्ही हल्ल्याची सुरक्षा यंत्रणांना माहिती देत अमरेजला स्थानिक डॉक्टरांकडे नेले. सदर डॉक्टरांनी त्याला श्रीनगरला नेण्यास सांगितल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, असे ताम्हीद पुढे म्हणाले. ताम्हीद आणि अमरेज यांच्या सहकाऱयांनी त्याचा मृतदेह बिहारला नेण्यासाठी सरकारला मदत करण्याचे आवाहन केले. त्यानंतर अमरेजचा मृतदेह मूळ गावी नेण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
या वर्षात आतापर्यंत काश्मीरमधील टार्गेट किलिंगमध्ये मारला गेलेला अमरेज हा चौथा गैर-स्थानिक कामगार ठरला आहे. 2017 ते 5 जुलै 2022 पर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये 28 स्थलांतरित मजुरांची दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. यापैकी बिहारमधील 7 मजुरांचा सर्वाधिक मृत्यू झाला आहे. याशिवाय महाराष्ट्रातील 2 आणि झारखंडमधील एका मजुराचा मृत्यू झाल्याचे अलीकडेच केंद्र सरकारने संसदेमध्ये सांगितले होते.