तुळशी विवाहाच्या दिवशी खांडेपार भागात शोककळा
प्रतिनिधी/ फोंडा
फोंडा-बेळगाव महामार्गावरील कुर्टी येथील आमिगोस हॉटेलजवळ मालवाहू ट्रकने दुचाकीला ठोकरल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. अशोक शाम नाईक (47, गावठण-खांडेपार) असे त्याचे नाव आहे. सदर अपघात काल शनिवारी दुपारी 11 वा. सुमारास घडला.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकीचालक आपल्या ऍक्टिवा जीए 05 एच 0821 ने खांडेपारहून फोंडय़ाच्या दिशेने येत होता. यावेळी त्याचदिशेने खांडेपारहून उड्डाणपूलावरून जाण्याच्या पवित्र्यात असलेल्या मालवाहू ट्रक जीए 08 यू 3648 ची धडक दुचाकीला बसली. पाठीमागील चाके त्याच्या डोक्यावरून गेल्याने दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीचालकाने हेल्मेट परिधान केले होते. मालवाहूच्या चाकात हेल्मेटसह डोके सापडल्याचा अंदाज फोंडा पोलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोमेकॉत दाखल करण्यात आला आहे. मयत अशोक हा अत्यंत सुस्वभावी इसम म्हणून खांडेपार भागात परिचित होता.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे. छोटे-मोठे कंत्राट घेऊन तो आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवित होता. त्यांच्या अकाली निधनामुळे पत्नी व लहान मुलांचा आधारच हरपला असून ऐन तुळशीविवाहाच्या दिवशी गावठण खांडेपार भागात शोककळा पसरली आहे.
याप्रकरणी मालवाहू ट्रक चालक फाजील अहमद फराश अब्दूल रहमान (43, मूळ हावेरी कर्नाटक) याला फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून उपनिरीक्षक नितेश काणकोणकर अधिक तपास करीत आहे.
महामार्गावर दुतर्फा पार्पिंगचे प्रकार, अपघातांचा वाढता धोका
खांडेपारहून फोंडामार्गे वळविताना सर्व्हिस रोड अरूंद आहे. महामार्गावरून जाण्यासाठी अवजड वाहने उड्डाणपुलावरून भरधाव जात असल्याने अपघाताच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. कुर्टी येथील आमिगोस जवळ ट्रक टर्मिलनसारख्या महामार्गाच्या दुतर्फा डबल पार्किंग सर्रास करण्याचे प्रकार सुरू आहे. वाहतूक पोलिसांनीही याप्रकरणी डोळेझाक केलेली आहे. रस्त्याच्या दुतर्फा कंटेनर पार्क केलेले आढळतात. अनेक अपघाताच्या घटना नोंद झालेल्या आहेत. याप्रकरणी सरकारने त्वरित तोडगा काढावा तसेच अपघातातील पीडित कुटूंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.