वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो झरदारी यांनी बुधवारी पाकिस्तानचे मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी राष्ट्रपती भवनात झालेल्या एका समारंभात 33 वर्षीय बिलावल यांना मंत्रिपदाची शपथ दिली. यावेळी पंतप्रधान शाहबाज शरीफ उपस्थित होते. बिलावल यांना विदेश मंत्रालयाची जबाबदारी मिळाली आहे.
बिलावल यांनी अलीकडेच लंडनमध्ये जात नवाज शरीफ यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान दोघांनी पाकिस्तानातील राजकीय स्थितीवर चर्चा केली आणि राजकारण तसेच राष्ट्रीय हिताशी संबंधित सर्व मुद्दय़ांवर मिळून काम करण्यावर प्रतिबद्धता दर्शविली होती. 11 एप्रिल रोजी शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. आघाडी सरकारमध्ये पीपीपी दुसरा सर्वात मोठा पक्ष आहे.
मंत्रिमंडळात 13 विभाग शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीग-एन या पक्षाला मिळाले आहेत. तर पीपीपीला 9 मंत्रिपदे मिळाली आहेत. जमीयत उलेमा-ए-इस्लाम-फजल या पक्षाच्या 4 खासदारांना मंत्रिपद मिळाले आहे. मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट-पाकिस्तानला 2 मंत्रिपदे प्राप्त झाली आहेत.