शिक्षकांसाठी शिक्षकाकडूनच लढा : बेळगाव, विजापूर, बागलकोट जिल्हय़ांतील शाळांमध्ये प्रचार
बेळगाव : यापूर्वी 2016 मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या वायव्य शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवून पहिल्या पसंतीची 1270 मते घेतलेले चंद्रशेखर लोणी यावेळी निधर्मी जनता दलाकडून नशीब अजमावत आहेत.
इंडी (जि. विजापूर) तालुक्मयातील अगसनाळ येथील बिरेश्वर हायस्कूलमध्ये इंग्रजी भाषा शिक्षक म्हणून सेवा बजावत असलेल्या लोणी यांनी यावेळीही अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. पण त्यांची क्षमता ओळखून माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा व माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी त्यांना ‘बी’ फॉर्म देऊन भाजप व काँग्रेससमोर कडवे आव्हान उभे केले आहे.
लोणी हे कर्नाटक राज्य माध्यमिक शाळा नोकर संघाचे विजापूर जिल्हा अध्यक्ष तसेच मुख्याध्यापक-प्राचार्य महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही परिणामकारकरित्या कार्य केले आहे. मागील निवडणुकीत त्यांना तिसऱया क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. यावेळी मात्र त्यांनी चांगली तयारी केली आहे. माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी निजदचे कार्यकर्ते, नेते, कर्नाटक राज्य नोकर संघाचे पदाधिकारी यांनी बेळगाव, विजापूर व बागलकोट जिल्हय़ांतील शाळांना भेट देऊन प्रचार केला आहे. शिक्षकांनी आपले मत शिक्षकालाच देऊन मतदारसंघ राजकारण्यांपासून शाबूत ठेवावा, असे आवाहन करीत आहेत.
नूतन पेन्शन योजना अवैज्ञानिक आणि नोकरविरोधी असून ती रद्द करून जुनी पेन्शन योजना अमलात आणण्यासाठी परिश्रम घेऊ, असे ते आश्वासन देत आहेत. तसेच 1995 नंतरच्या शिक्षण संस्थांना अनुदान मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देत आहेत. भाजपचे उमेदवार अरुण शहापूर यांनी दोन वेळेच्या कार्यकाळात शिक्षकांच्या समस्यांबाबत कोणतेही ठोस काम केलेले नाही. तर काँग्रेसचे उमेदवार प्रकाश हुक्केरी यांचे वय झाले आहे. यापूर्वी निधर्मी जनता दलाचे एस. एस. पुजारी हे तीन वेळा निवडून येऊन एक आदर्श कार्य केले आहे. त्याप्रमाणे आपणदेखील उत्कृष्ट कार्य करू असेही ते सांगत आहेत.