नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नेते आणि अधिकाऱयांची हेरगिरी केल्याप्रकरणी भाजप कार्यकर्त्यांनी गुरुवारीही आप कार्यालयाबाहेर गोंधळ घातला. आंदोलनादरम्यान भाजपने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या आंदोलनामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत आपच्या मुख्यालयात होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आला.
केजरीवाल सरकारच्या फीडबॅक युनिटद्वारे हेरगिरी केल्याच्या आरोपावरून गृह मंत्रालयाने बुधवारी सिसोदिया यांच्याविरुद्ध सीबीआय चौकशीला मंजुरी दिली होती. यानंतर भाजपने गुरुवारी हेरगिरी प्रकरणात आम आदमी पार्टीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. नेते आणि अधिकाऱयांची हेरगिरी केल्याप्रकरणी भाजप कार्यकर्त्यांनी आज दुसऱया दिवशीही आप कार्यालयाबाहेर गोंधळ घातला. याआधी बुधवारीही भाजप कार्यकर्त्यांनी याप्रकरणी आपविरोधात निदर्शने केली होती. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या राजीनाम्याची मागणी केली. याप्रकरणी पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.