चंदगड मतदारसंघातून भाजपची उमेदवारी घेण्याचा प्रस्ताव
कुपेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट
-कार्यकर्त्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेणार-कुपेकर
कृष्णात चौगले,कोल्हापूर
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये चंदगड मतदारसंघातून एक आश्वासक चेहरा म्हणून संग्राम कुपेकर यांनी भाजपची उमेदवारी घ्यावी अशी ऑफर भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली. भाजपमधील प्रमुख नेत्याने फोनवरून दिलेल्या निरोपानुसार कुपेकर यांनी सकाळी साडेनऊच्या सुमारास हॉटेल पंचशील येथे फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी खासदार धनंजय महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे, माजी आमदार अमल महाडिक उपस्थित होते. फडणवीस यांनी दिलेल्या उमेदवारीच्या ‘ऑफर’बाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करून लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ, असे कुपेकर यांनी ‘तरुण भारत संवाद’ शी बोलताना सांगितले.
जिह्यात भाजपची ताकद वाढवण्यासाठी अन्य पक्षातील ताकदीचे नेते आणि कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घ्यावे अशा सूचना भाजपचे राष्ट्रीय नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी झालेल्या भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत दिल्या होत्या. त्यानुसार सोमवारी कणेरी मठ येथील ‘सुमंगलम्’ महोत्सवाच्या उद्घाटनासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हॉटेल पंचशील येथे सकाळी जिह्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. यामध्ये विधानसभा मतदारसंघनिहाय कोणकोणते ताकदीचे नेते भाजपमध्ये घेणे शक्य आहे, याबाबत चर्चा झाली. त्यानुसार चंदगड विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून संग्राम कुपेकर यांना भाजपची उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाली असल्याचे समजते. त्यानुसार कुपेकर यांना पंचशील हॉटेलमध्ये बोलावून घेऊन त्यांच्याशी भाजप पक्ष प्रवेश आणि चंदगड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार धनंजय महाडिक यांनी चर्चा केली. यावेळी विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक असलो तरी अद्याप कोणत्या पक्षातून उमेदवारी घ्यायची याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करून लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ असे कुपेकर यांनी सांगितले असल्याची चर्चा आहे.
कुपेकर यांनी 2014 साली जनसुराज्य शक्ती पक्ष पुरस्कृत उमेदवारी घेऊन विधानसभा निवडणूक लढवली आहे. 2019 मध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना 37 हजार मते मिळाली. त्यांनी गडहिंग्लज पंचायत समिती सभापती, जि.प.आरोग्य व बांधकाम समिती सभापती, चंदगड तालुक्यातील संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. सद्यस्थितीत चंदगड मतदारसंघात कुपेकर यांच्याकडे सुमारे 40 हजार मतांचा गठ्ठा आहे. या मतदारसंघात बहुरंगी लढत झाल्यास विजयासाठी 51 ते 52 हजार मतांची गरज आहे. त्यामुळे कुपेकर यांना भाजपची ताकद मिळाल्यास तेथून भाजपचा आमदार होण्याची संधी मिळू शकते. गेल्या काही दिवसांत जिल्हा बँक, गडहिंग्लज साखर कारखान्याच्या निवडणुकीत कुपेकर राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यासोबत असले तरी त्यांच्यावर सद्यस्थितीत कोणत्याही पक्षाचा शिक्का नाही. त्यामुळे ते भाजपची उमेदवारी घेऊ शकतात, अशी कुपेकर गटात चर्चा आहे.
कुपेकर यांना उमेदवारी देऊन भाजपकडून ‘सेफगेम’चा प्रयत्न
विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेनेची (शिंदे गट) युती होणार आहे. यामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला पाहता शिवसेनेला 4, भाजपला 4, जनसुराज्य शक्ती पक्षाला 1 आणि आवाडे गटाला 1 जागा दिली जाणार आहे. यामध्ये शिवसेनेकडून करवीरमधून माजी आमदार चंद्रदीप नरके, कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर, राधानगरीतून आमदार प्रकाश आबिटकर तर शिरोळमधून आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची उमेदवारी असेल. भाजपकडून कोल्हापूर दक्षिणमधून माजी आमदार अमल महाडिक, कागल येथून समरजित घाटगे, हातकणंगलेतून दलितमित्र अशोकराव माने, तर चंदगडमधून संग्राम कुपेकर यांना उमेदवारी देऊन भाजपकडून सेफगेम खेळला जाण्याची शक्यता आहे. पन्हाळा-शाहूवाडीतून जनसुराज्यचे सर्वेसर्वा विनय कोरे, तर इचलकरंजीतून आमदार प्रकाश आवाडे यांची उमेदवारी असेल.