कणकवली : वार्ताहर-
कणकवली शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौकानजीक असलेल्या लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्समधील आपल्या गाळ्याचा ताबा घेतला आणि याबाबत विचारणा केली असता आपला मुलगा व पुतण्या यांना दमदाटी केली. तसेच हॉलमधील भिंत फोडून नुकसान केले, अशी तक्रार भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी कणकवली शहरातील व्यवसायिक अनिल वसंत मांजरेकर (६० श) यांच्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार मांजरेकर व त्यांचा मुलगा अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजन तेली यांच्या फिर्यादीनुसार, तेली यांचा लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्समधील ‘अप्पर ग्राऊंड फ्लोअर’वर गाळा आहे. २२ जूनला सकाळी १० वा. सुमारास अनिल वसंत मांजरेकर व त्यांचा मुलगा अनिकेत अनिल मांजरेकर यांनी अनधिकृत ताबा घेऊन गाळ्याला टाळे लावले. याविषयी तेली यांचा मुलगा प्रथमेश तेली व पुतण्या प्रसाद तेली असे दोघे विचारणा करण्यासाठी गेले असता मांजरेकर यांनी त्यांना दमदाटी केली. तर याच रात्री ९.३० वा. सुमारास मांजरेकर यांनी कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावरील हॉलमधील भिंत ड्रील ब्रेकरने फोडून नुकसान केले व हॉलचा अनधिकृत ताबा घेतला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादीनुसार मांजरेकर पिता पुत्र यांच्याविरोधात भा.दं.वि. कलम ४४७, ४४८, ४२७, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.