पक्षाकडून विशेष तयारी ः दक्षिणेतील राज्यांवर लक्ष केंद्रीत
@वृत्तसंस्था / हैदराबाद
महाराष्ट्रात सत्तास्थानी येत भाजपने पश्चिमोत्तर क्षेत्रात स्वतःची स्थिती बळकट केली आहे. भाजपची नजर आता दक्षिणेतील राज्यांवर विशेषकरून तेलंगणावर आहे. भाजपची दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये शनिवारपासून सुरू होणार आहे. ही एक मोठी आणि महत्त्वाची बैठक असणार आहे. मागील 18 वर्षांमध्ये पहिल्यांदाच हैदराबादमध्ये याचे आयोजन होत असून पूर्ण शहर याकरता सज्ज आहे. हे तीन दिवस भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचे असून अनेक जण भाजपच्या बाजूने प्रेरित झाल्याचे दिसून येईल, असे विधान पक्षाचे प्रवक्ते एन. व्ही. सुभाष यांनी शुक्रवारी केले.
राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक 2 जुलै रोजी संध्याकाळी 3 वाजता सुरू होईल आणि 3 जुलैच्या संध्याकाळपर्यंत चालणार आहे. राष्ट्रीय कार्यकारिणी अधिवेशनानंतर एक विशाल सभा आयोजित करण्यात आली असून याला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. पंतप्रधान शनिवारी बेगमपेट येथे पोहोचणार असून तेथे त्यांच्या सार्वजनिक स्वागताची तयारी केली जात असल्याचे पक्ष प्रवक्त्याने सांगितले.
भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा शुक्रवारी शमसाबाद येथे पोहोचले आहेत. शुक्रवारीच एक छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून यात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मागील बैठकांची छायाचित्रे असणार आहेत. पक्षाच्या अन्य प्रमुख कार्यक्रमांची छायाचित्रेही यात सामील करण्यात आली आहेत.
राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक हैदराबादमध्ये 18 वर्षांनी होत आहे. पक्षाचे राष्ट्रीय नेते, मुख्यमंत्री आणि अन्य नेते तेलंगणातील 119 विधानसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. कार्यकारिणी बैठकीदरम्यान तेलंगणात पुढील वर्षी होणाऱया विधानसभा निवडणुकीसह 2024 मधील लोकसभा निवडणुकीकरता रणनीति आखली जाणार आहे. तेलंगणात मुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्रसमितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांच्यासमोर मोठे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न भाजपने चालविला आहे. भाजपने हैदराबाद महापालिका तसेच हुजुराबाद तसेच दुब्बाका या मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये चांगली कामगिरी केली आहे.