वृत्तसंस्था/ जयपूर
भाजपने राजस्थानात राज्यसभा निवडणुकीत ‘क्रॉस व्होटिंग’ करणाऱ्या आमदार शोभारानी कुशवाह यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षाच्या केंद्रीय शिस्तपालन समितीचे सचिव ओम पाठक यांनी पत्र पाठवुन आमदाराला ही माहिती दिली आहे. पत्रानुसार पक्षाचे आमदार म्हणून कुशवाह यांच्याकडून झालेल्या शिस्तभंगाप्रकरणी वेगळी कारवाई करण्यात येणार आहे.
10 जून रोजी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत कुशवाह यांनी पक्षाच्या व्हिपचे उल्लंघन करत काँग्रेस उमेदवार प्रमोद तिवारी यांना मतदान केले होते. भाजपने त्याच दिवशी कुशवाह यांना पक्षातून निलंबित करत कारणे दाखवा नोटीस बजावली होती. पक्षाने राज्यसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवाराला मतदान करण्यास सांगितले होते असा दावा कुशवाह यांनी केला होता.
दुसऱ्यांदा आमदार झालेल्या शोभारानी या बसपचे माजी आमदार बी.एल. कुशवाह यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या पतीला डिसेंबर 2016 मध्ये हत्येप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. यामुळे आमदार म्हणून ते अपात्र ठरले होते. 2017 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शोभारानी भाजपच्या तिकिटावर विजयी झाल्या होत्या. 2018 च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी विजय मिळविला होता.