दामोदर शिरोडकर नगराध्यक्षदी बिनविरोध : सतरा वर्षांनंतर बनला भाजपचा नगराध्यक्ष
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपचे गेले कित्येक दिवस प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नाना काल अखेर यश आले. हल्लीच काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले नगरसेवक दामोदर शिरोडकर यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यामुळे तब्बल 17 वर्षांनंतर मडगाव पालिकेवर भाजपने आपला झेंडा फडकविला. नवनिर्वाचित नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांचे मडगावचे आमदार दिगंबर कामत, भाजपचे सरचिटणीस दामू नाईक यांनी अभिनंदन केले आहे. दरम्यान, गोवा फॉरवर्डच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षपदाच्या निवडीवर बहिष्कार घातला.
मडगाव पालिका क्षेत्राचा सर्वागिण विकास करण्यासाठी आपले सातत्याने प्रयत्न असतील. आपण ठराविक क्षेत्राला प्राधान्य देणार अशी घोषणा या क्षणी करणार नाही. पालिका क्षेत्राचा सर्वागिण विकास हेच आपले ध्येय आहे. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आपले राजकीय गुरू तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत व फातोर्डाचे माजी आमदार तथा भाजपचे सरचिटणीस दामू नाईक यांच्या सहकार्याने आपल्या सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन विकासाला चालना द्यायची आहे अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
आईने शेतकाम करून आपल्याला शिकविले
आपल्या आईने शेतकाम करून आपल्याला शिकविले. आईच्या कष्टामुळेच आपण घडलो. ज्या प्रभागात आपण राहतो, त्याच प्रभागातून आपण तिसऱयांदा निवडून आलेलो आहे. एकदा आपली पत्नी या प्रभागातून विजयी झालेली आहे. आपल्याला नेहमीच आमदार दिगंबर कामत यांचे मार्गदर्शन लाभत आलेले आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला नगराध्यक्षाच्या खुर्चीवर बसविण्यात आमदार दिगंबर कामत, माजी आमदार दामू नाईक व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मोलाचे योगदान असल्याचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी सांगितले.
आता जबाबदारी वाढलीय…
आजही ही नवीन सुरवात आहे. मडगाव पालिकेत भाजपची सत्ता आलेली आहे. त्यामुळे जबाबदारी वाढलीय. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे मडगावच्या विकासाला चालना मिळणार असल्याची प्रतिक्रिया आमदार दिगंबर कामत यांनी व्यक्त केली. मडगाव व फातोर्डा असा आपल्याला भेदभाव करायचा नाही. यापूर्वी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालय, रवींद्र भवन, नवीन जिल्हा इस्पितळ हे सर्व प्रकल्प साकारताना मडगाव हाच केंद्र बिंदू ठेऊन निर्माण केले होते. त्यावेळी दामू नाईक हे फातोर्डाचे आमदार होते व त्यांचे सहकार्य या प्रकल्पांना मिळाले होते अशी माहिती दिगंबर कामत यांनी यावेळी दिली.
दामोदर शिरोडकर हे अनुभवी नगरसेवक आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदी अनुभवी व्यक्ती पोचल्याने पालिकेचे कामकाज चालविणे त्यांना शक्य होईल. त्यांना आपले तसेच दामू नाईक यांचे पूर्ण सहकार्य मिळणार असल्याचे कामत म्हणाले.
प्रगतीचा मार्ग मोकळा…
मडगाव पालिकेत भाजपची सत्ता आल्याने आता प्रगतीचा मार्ग मोकळा झाल्याचे दामू नाईक म्हणाले. सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन पालिकेच्या क्षेत्रासाठी कार्यरत रहावे व उत्कर्ष साध्य करावा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारकडून प्रोत्साहन व पाठिंबा मिळेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
पिंपळकट्टय़ावर घेतले दामबाबाचे दर्शन
दामोदर शिरोडकर यांची नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी व साथी नगरसेवकांनी मडगावच्या पिंपळकट्टय़ावर जाऊन श्री दामबाबाचे दर्शन घेतले. यावेळी मडगावचे आमदार दिगंबर कामत, फातोर्डाचे माजी आमदार दामू नाईक याची उपस्थिती होती.