Tarun Bharat

गुजरात भाजपमय, हिमाचलात ‘हात’

भाजपला 182 पैकी 156 जागा, पंतप्रधान मोदींकडून मतदार-कार्यकर्त्यांचे आभार : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला सर्वाधिक 40 जागा

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत कधीही नव्हे, इतक्या विक्रमी जागा जिंकल्या आहेत. पक्षाला एकंदर 182 जागांपैकी 156 जागांवर यश प्राप्त झाले असून या राज्यात इतक्या जागा आजवर कोणत्याही पक्षाला मिळालेल्या नाहीत. त्याचप्रमाणे भाजपने गुजरातमध्ये सलग सातव्यांदा विधानसभा निवडणूक जिंकली असून डाव्या पक्षांच्या पश्चिम बंगालमधील उच्चांकाची उंची गाठली आहे. पक्षाच्या या अतिभव्य विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदार आणि कार्यकर्ते यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील ही विधानसभा निवडणूक आव्हानात्मक परिस्थितीत पार पडली आहे. कोरोनाच्या तडाख्यामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, वाढती महागाई आणि बेरोजगारी यांच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक झाली. या मुद्दय़ांवर अनेक इतर मुद्दे राजकीय पक्षांनी उपस्थित केले होते.

गुजरात भाजपमय

भारतीय जनता पक्षाने गुजरातमध्ये न भूतो न भविष्यती असे प्रचंड यश प्राप्त केले आहे. या राज्यातील विधानसभा जागांचा आतापर्यंतचा विक्रम या पक्षाने प्रस्थापित केला आहे. यापूर्वी 1972 मध्ये काँगेसने 168 पैकी 140 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर 1985 मध्ये याच पक्षाने 182 पैकी 149 जागांवर विजय मिळविला होता. तथापि, भाजपने एकाच तडाख्यात काँगेसचे हे दोन्ही उच्चांक मोडीत काढले आहेत. भाजपने 182 पैकी 156 जागा असे घवघवीत यश मिळवून विरोधकांना अवघ्या 26 जागांवर समाधान मानावयास भाग पाडले.

भाजपचा जल्लोष

गुजरातमधील विजयाचा जल्लोष भाजपने दिल्लीतील मुख्यालयाच्या परिसरात आणि इतर राज्यांमध्येही साजरा केला आहे. दिल्लीतील मुख्यालयातील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी झाले होते. यावेळी बोलताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी विरोधकांवर टीका केली. गुजरातचा अपमान ज्यांनी केला त्यांना येथील जनतेने धडा शिकविला असे वक्तव्य करत त्यांनी पंतप्रधान मोदींना अप्रत्यक्षरित्या रावणाची उपमा देणारे काँगेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तसेच आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचा समाचार घेतला.

काँगेसचा नीचांक

एकीकडे भाजप उच्चांकी कामगिरी नोंदवित असताना काँगेसने गुजरातमध्ये आतापर्यंतची त्याची सर्वात कमी आमदारसंख्या गाठली आहे. यापूर्वी 1990 च्या विधानसभा निवडणुकीत काँगेसला 33 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत या पक्षाला अवघ्या 17 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. मतांच्या टक्केवारीच्या दृष्टीनेही काँगेसने राज्यातील आपली सर्वात कमी पातळी गाठली. या पक्षाला या निवडणुकीत अवघी 28 टक्के मते मिळाली आहेत.

‘आम आदमी’ भुईसपाट

गुजरात जिंकायचाच, अशी महत्वाकांक्षा बाळगून यंदा प्रथमच गुजरात विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या आम आदमी पक्षाची पहिल्याच प्रयत्नात पाठ जमिनीला लागली. बहुमत मिळेल असा आत्मविश्वास मतदानाचे दोन्ही टप्पे पार पडल्यानंतर आणि मतदानोत्तर सर्वेक्षणांचे निष्कर्ष प्रसिद्ध झाल्यानंतरही या पक्षाचे नेते व्यक्त करीत होते. पण दिल्ली आणि पंजाबबाहेर या पक्षाला फारसे महत्व निदान सध्यातरी नाही, असाच संदेश मतदारांनी दिला. या पक्षाला केवळ पाच जागांची कमाई करता आली. 20 टक्क्यांपर्यंत मते मिळवून आपली छाप पाडायची आणि पुढच्या निवडणुकीत अन्य पक्षांसमोर जबर आव्हान उभे करायचे, अशी योजना या पक्षाची असल्याचे तज्ञांचे म्हणणे होते. तथापि, मतांच्या टक्केवारीचे हे लक्ष्य गाठणेही या पक्षाला साध्य न झाल्याने आता त्याला आपले धोरण नव्याने आखावे लागण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशातही या पक्षाच्या हाती एकही जागा लागलेली नाही. त्यामुळे त्याची कामगिरी काहीशी निराशाजनक झाली.

यापुढे विकास हेच ध्येय

गुजरातमधील उच्चांकी विजयाचा आनंद साजरा कारण्यासाठी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात गुरुवारी संध्याकाळी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमात भाषण करताना विकास हेच ध्येय असेल अशी घोषणा केली. गुजरातच्या मतदाराने खरोखरच अभूतपूर्व कामगिरी या निवडणुकीत केली. मी गुजरातच्या जनतेला नमन करतो. हिमाचल प्रदेशात आमचा पराभव अतिशय कमी मतांनी झाला आहे. आम्ही या राज्यासाठी भविष्यकाळात अधिक प्रयत्न करु असे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केले.

मागच्या वेळचे ‘पोस्टरबॉय’ विजयी

2017 च्या निवडणुकीत आकर्षणाचा बिंदू ठरलेले हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवाणी आता आमदार झाले आहेत. हार्दिक पटेल यांनी 51 हजारांच्या, अल्पेश ठाकोर यांनी 43 हजारांच्या तर जिग्नेश मेवाणी यांनीही 5 हजारांहून अधिक मंतांनी चुरशीच्या लढतीत विजय मिळविला आहे.

काँगेस उमेदवाराचा आत्महत्येच्या प्रयत्न

काँगेसचे उमेदवार भरत सोळंकी यांनी निवडणुकीत पराभूत होण्याच्या भीतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा काँगेसने केला आहे. मतदानयंत्र घोटाळय़ामुळे आपला पराभव होत आहे. या घोटाळय़ाचा निषेध म्हणून त्यांनी आपल्या उपरण्याचा गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असे सांगण्यात आले. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आपचा प्रवेश कोणाच्या पथ्यावर ?

गुजरात निवडणुकीत आम आदमी पक्षाने प्रथमच सहभाग घेतला होता. या पक्षाने काँगेसची मते आपल्याकडे खेचल्याने काँगेसला फटका बसला अशी चर्चा आहे. मात्र सर्व मतदारसंघांमधील मतांची परिस्थिती पाहता हा दावा खरा नसल्याचे आढळून येते. कारण भाजपने जिंकलेल्या 156 जागांपैकी केवळ 22 जागांवर आम आदमी पक्ष आणि काँगेस यांच्या मतांची बेरीज भाजपच्या मतांपेक्षा जास्त आहे, असे प्रथमदर्शनी दिसून येते, असे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाने काँगेसची हानी केली हे खरे नसल्याचे दिसून येत आहे.

लाट लक्षात कशी आली नाही ?

गुजरातमध्ये भाजपला मिळालेली मते आणि त्याने जिंकलेल्या जागांची विक्रमी संख्या पाहता राज्यात भाजपची लाट होती, असेच दिसून येते. मात्र, कोणत्याही माध्यमाला किंवा वृत्त वाहिनीला, तसेच राज्यात ‘ग्राऊंड रिपोर्टींग’ करणाऱया पत्रकारांनाही या लाटेची जाणीव कशी झाली नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. मतदान पूर्ण होण्यापूर्वी अनेकांनी भाजपला बहुमत मिळेल पण ते मर्यादित असेल. आम आदमी पक्ष आपला ठसा उमटवेल, अशी भाकिते केली होती. पण ती खोटी ठरल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे लाट दिसलीच नाही की ती समजत असूनही तसे हेतूपुरस्सर मांडण्यात आले नाही, असेही विचारले जात आहे.

मुख्यमंत्री विजयी, इच्छुक पराभूत

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल या निवडणुकीत मोठय़ा मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. तर हिमाचल प्रदेशचे मावळते मुख्यमंत्री जयराम ठाकूर सलग सहाव्यांदा विजयी झाले आहेत. मात्र आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ईसुदान गढवी यांना मात्र पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.

‘रेवडी’ संस्कृतीला धक्का

गुजरातमध्ये आम आदमी पक्ष आणि काँगेस यांनी मतदारांना अनेक प्रलोभनात्मक आश्वासने दिली होती. 300 युनिट वीज विनामूल्य, प्रत्येक महिलेला प्रतिमहिना 1 हजार रुपये, विनामूल्य शिक्षण आदी आश्वासने दिली होती. तथापि, गुजरातच्या मतदारांनी या आश्वासनावर विश्वास ठेवलेला दिसून आलेला नाही. भाजपनेही अशा प्रकारची काही आश्वासने दिली होती. तथापि, ती काँगेस किंवा आम आदमी पक्षाच्या तुलनेत सौम्य होती. मतदारांना ती आवडल्याचे दिसते.

हिमाचलमध्ये काँगेसला फुटीची चिंता

हिमाचल प्रदेशने मात्र काँगेसची लाज राखली आहे. या राज्यात काँगेसने 68 पैकी 40 जागा जिंकून पूर्ण बहुमत मिळविले आहे. कोणत्याही पक्षाला सलग दोनदा बहुमत न देण्याची गेल्या 37 वर्षांची परंपरा या राज्याने अशाप्रकारे कायम राखली आहे. भाजपला या राज्यात 25 जागांवर समाधान मानावे लागले आहे.  हिमाचल प्रदेशात काँगेसला बहुमत मिळाले असले तरी आपले आमदार फुटून भाजपकडे जातील का, याची चिंताही काँगेसला लागून राहिली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आपल्या आमदारांची ‘शिकार’ होऊ नये यासाठी त्यांना मोहाली येथील अतिथीगृहात पाठविण्याची योजना आहे.

काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री निवडीसाठी मंथन

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमाचलमधील विजयानंतर काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री निवडीसाठी मंथन सुरू झाले आहे. यामध्ये हिमाचल काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिभा सिंह आणि माजी प्रदेशाध्यक्ष सुखविंदर सिंग सुक्खू यांच्या नावांचा विचार केला जात आहे. प्रतिभा सिंह हिमाचल प्रदेशातील मंडी येथून खासदार आहेत. हिमाचलचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या त्या पत्नी आहेत.

मतमोजणी केंद्रातील छत कोसळून ईव्हीएम तुटले

राज्यातील मतमोजणीदरम्यान कांगडा विधानसभेची मतगणना सुरू असताना दुपारी 12.15 वाजता कांगडा पॉलिटेक्निक येथील मतमोजणी केंद्रात छताचा काही भाग कोसळल्याने गोंधळ उडाला. या दुर्घटनेनंतर मतमोजणी केंद्रात बसलेले मतदान कर्मचारी आणि राजकीय पक्षांचे एजंट बाहेर धावले. मतमोजणी थांबली त्यावेळी कांगडा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार सुरेंद्र कुमार हे भाजपच्या पवनकुमार काजल यांच्यापेक्षा पिछाडीवर होते. छताचा काही भाग कोसळल्याने ईव्हीएम बिघडल्यामुळे आपण मतमोजणी मान्य करणार नाही, असे सुरेंद्रकुमार यांनी स्पष्ट केले. ज्या इमारतीच्या फरशा पडल्या त्या इमारतीचे बांधकाम दोन वर्षांपूर्वीच झाले होते. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या इमारतीचे उद्घाटन केले होते.

हिमाचल प्रदेशमधील महत्त्वाचे निकाल

 • रामपूरमधून काँग्रेसचे उमेदवार नंदलाल 567 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या कौल सिंग यांचा पराभव केला. नंदलाल यांना 28397 तर कौल यांना 27830 मते मिळाली.
 • चौपालमध्ये भाजपचे उमेदवार बलवीर वर्मा 4,894 मतांनी विजयी झाले. त्यांना 25,231 मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार रजनीश किमटा यांना 20,337 तर अपक्ष उमेदवार सुभाष मांगलेट यांना 13,452 मते मिळाली.
 • थिओगमध्ये काँग्रेसचे कुलदीप राठोड 5,269 मतांनी विजयी झाले. कुलदीप यांना 19,447 मते मिळाली. त्यांनी भाजपचे उमेदवार अजय श्याम यांचा 14,178 मतांनी पराभव केला. सीपीआय(एम)चे राकेश सिंघा 12210 मतांसह तिसऱया क्रमांकावर आहेत.
 • रोहरूमधून काँग्रेसचे उमेदवार मोहनलाल ब्रक्त विजयी झाले. भाजपच्या शशी बाला यांचा पराभव केला. शिमला ग्रामीणमधून काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह विजयी झाले. त्यांनी भाजपचे रवी मेहता यांचा पराभव केला.
 • जुब्बल कोटखई येथून काँग्रेसचे उमेदवार रोहित ठाकूर विजयी झाले. त्यांनी भाजपचे उमेदवार चेतन ब्रक्ता यांचा 5622 मतांनी पराभव केला. रोहित ठाकूर यांना 30362 तर चेतनला 25796 मते मिळाली.

निवडणूक परिणाम आकडेवारीत…

गुजरात

 • एकंदर जागा 182
 • भाजप 156 (52.6 टक्के मते)
 • काँगेस 17 (27.3 टक्के मते)
 • आप 5 (12.9 टक्के मते)
 • अपक्ष, इतर 4 (7.2 टक्के मते)

हिमाचल प्रदेश

 • एकंदर जागा 68
 • काँगेस 40 (43.9 टक्के मते)
 • भाजप 25 (43.0 टक्के मते)
 • अपक्ष, इतर 3 (13.1 टक्के मते)

‘गुजरातमधील विजय अभूतपूर्व आहे. मी सर्व मतदारांना नमन करतो. सर्व समाज घटकांचा विकास हेच आता ध्येय राहील, आदिवासींना सक्षम करणे, देश प्रथम या भावनेने कार्य करणे आणि सर्वंकष प्रगती घडविणे हेच आमचे कार्य आहे. ‘आमदनी अठ्ठनी, खर्चा रुपय्या’ अशी प्रवृत्ती नको. सकारत्मकता हाच आमचा आत्मा आहे. राष्ट्रनिर्माणासाठी व्यापक अभियान चालविले आहे.

नरेंद्र मोदी, पंतप्रधान

‘लोकशाही व्यवस्थेत यश आणि अपयश हे येतच असते. हिमाचल प्रदेशात काँगेसचा विजय झाल्याचा आनंद आहे. यासाठी तेथील मतदारांचे आम्ही आभार मानतो. गुजरातमधील पराभव पक्षाने स्वीकारला आहे. आम्ही भविष्यकाळात अधिक कष्ट करुन पक्षाला गतवैभव पुन्हा प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न करणार आहोत. निवडणुकांचे परिणाम विनम्रपणे स्वीकारत आहोत.

मल्लिकार्जुन खर्गे, काँगेस अध्यक्ष

Related Stories

विचारसरणीपेक्षा देश महत्त्वाचा

Patil_p

केंद्रीय अर्थसंकल्पात जागतिक किमान कर योजनेचा आरंभ होणार?

Patil_p

सर्वोच्च न्यायालयातील 4 न्यायमूर्तींना कोरोना

Amit Kulkarni

नवे बाधित नियंत्रणात; कोरोनाबळींचा उच्चांक

Patil_p

अखिलेश यादव आणि आझम खान यांनी दिला खासदारकीचा राजीनामा

Abhijeet Khandekar

New delhi; दिल्लीत वाऱ्यासह मुसळधार पाऊस

Patil_p