Tarun Bharat

पुढील 30-40 वर्षे देशात भाजपचीच सत्ता!

कार्यकारिणी बैठकीत अमित शहा यांचा दावा : पंतप्रधान मोदींनी हैदराबादला संबोधले ‘भाग्यनगर’

हैदराबाद / वृत्तसंस्था

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दुसऱया दिवशी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संबोधित केले. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात हैदराबादचा ‘भाग्यनगर’ असा उल्लेख करत तेलंगणावासियांचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला. तर, अमित शहा यांनी पुढील 30 ते 40 वर्षे देशात भाजपची सत्ता असेल आणि भारत ‘विश्वगुरु’ बनेल, असे स्पष्ट केले. हैदराबाद येथील इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये शनिवारी राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीची औपचारिक सुरुवात झाल्यानंतर रविवारी पंतप्रधान मोदींच्या भाषणाने सांगता करण्यात आली.

हैदराबादमध्ये आयोजित भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा रविवारी दुसरा दिवस होता. पंतप्रधान मोदी आज सभेला संबोधित करणार असल्याने सर्वांच्या नजरा पंतप्रधानांच्या भाषणाकडे आणि राजकीय प्रस्तावाकडे लागल्या होत्या. समारोपपर भाषणात पंतप्रधानांनी पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत काही महत्त्वाचे सल्ले उपस्थितांना दिले. ‘भाग्यनगर’मध्येच (हैदराबाद) सरदार पटेल यांनी ‘एक भारत श्रे÷ भारत’चा नारा दिला होता. आमच्या पक्षाचा नाराही तोच असून तुष्टीकरण संपवून तृप्तीचा मार्ग स्वीकारणे हे पक्षाचे ध्येय असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. तसेच रालोआच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारीचे कौतुक करत हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे सांगितले.

‘त्यांच्या’ चुकांमधून तुम्ही धडा घ्या ः मोदी

घराणेशाहीचे राजकारण आणि घराणेशाहीचे राजकारण करणाऱया पक्षांमुळे देश त्रस्त झाला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. असे पक्ष देशात फार काळ टिकणार नाहीत. काही पक्ष आपले अस्तित्व वाचवण्यासाठी लढत आहेत. अशा पक्षांची खिल्ली उडवू नये तर त्यांच्या चुकांमधून धडा घ्यायला हवा, असे सांगत मोदींनी उपस्थित नेत्यांना मौलिक सल्ला दिला. तसेच पंतप्रधान मोदींनी पक्षाच्या सदस्यांना ‘स्नेह यात्रा’ काढण्यास आणि समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यास सांगितले.

भाजपच्या लोकशाही विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल पंतप्रधानांनी विरोधी पक्षांना धारेवर धरताना त्यांच्या संघटनांच्या तत्त्वांनुसार लोकशाहीची व्याख्या काय आहे? असा सवाल केला. पत्रकार परिषदेत पक्षाचे ज्ये÷ नेते रविशंकर प्रसाद यांनी पंतप्रधानांनी आपल्या भाषणात मांडलेल्या विविध मुद्दय़ांचा परामर्ष घेतला. हैदराबादचा ‘भाग्यनगर’ असा उल्लेख करून मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांना उजाळा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तेलंगणा-बंगालमध्येही लवकरच भाजपची सत्ता!

कार्यकारिणीच्या बैठकीत गृहमंत्री अमित शहा यांनी जातीवाद, घराणेशाही आणि तुष्टीकरण हा राजकारणातील मोठा शाप असल्याचे स्पष्ट केले. तसेच तेलंगणा आणि पश्चिम बंगालमध्येही भाजप लवकरच सरकार स्थापन करेल, असा दावा शाह यांनी केला आहे. दोन्ही राज्यातील घराणेशाही पक्षांचे वर्चस्व संपेल. केरळ, आंध्रप्रदेश आणि ओडिशामध्येही पक्ष सरकारस्थापनेची तयारी करत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

गुजरात दंगलीचा ‘न्याय’ ऐतिहासिक

गुजरात दंगलीवरील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ऐतिहासिक असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सर्व आरोप खोटे ठरवले असून न्यायालयाने ते राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी संविधानावर विश्वास ठेवला, गुजरात दंगलीप्रकरणी एसआयटीचा सामना केला, पण भ्रष्टाचाराचे आरोप असताना विरोधक अराजकता निर्माण करत आहेत, असा टोमणाही त्यांनी मारला.

काँग्रेस निराश आणि हताश

आज केंद्राच्या योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचत आहे. यामुळेच काँग्रेस निराश आणि हताश असून केंद्र सरकारच्या प्रत्येक कल्याणकारी योजनांना विरोध करते. सर्जिकल स्ट्राईक असो की एअर स्ट्राईक, तसेच काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याचा मुद्दा किंवा देशाने राबविलेल्या कोरोना प्रतिबंधक जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिमेवरही विरोधकांनी विनाकारण टीका केल्याचे ते पुढे म्हणाले. आज विरोधी पक्षात फूट पडली आहे. काँग्रेसचे सदस्य पक्षात लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी लढा देत असतानाच भीतीपोटी पक्षाध्यक्ष निवडला जात नाही. काँग्रेसला ‘मोदी फोबिया’ झाला असून राष्ट्रहितासाठी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला त्यांचा विरोध असल्याचा हल्लाबोलही त्यांनी चढवला.

राजकीय, आर्थिक ठरावावर चर्चा

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवारी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीची माहिती दिली. राष्ट्रीय कार्यकारिणी समितीच्या बैठकीच्या पहिल्या दिवशी आर्थिक ठरावावर चर्चा झाली. तर दुसऱया दिवशी राजकीय ठरावावर चर्चा करण्यात आली. गृहमंत्री अमित शहा यांनी ठराव मांडला आणि तो एकमताने मंजूर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शनिवारी झालेल्या बैठकीत पक्षाने अर्थव्यवस्था आणि गरीब कल्याणाचा ठराव मंजूर केला होता.

Related Stories

कल्याण ज्वेलर्सच्या नफ्यात वाढ

Patil_p

आर्यन खानच्या समर्थनार्थ शिवसेनेची याचिका

Patil_p

चंद्र आणि मंगळाची आज पिधानयुती

Archana Banage

बेळगावात संचारबंदी धर्तीवर लॉकडाऊन

tarunbharat

केरळमध्ये इन-कार डायनिंग सुविधा

Patil_p

दिल्लीत भिषण आग, अनेकजण अडकले

prashant_c