Tarun Bharat

बंडखोरीच्या राजकारणात भाजपला रस नाही

पिंपरी / प्रतिनिधी :

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील शिवसेनेचे माजी नगरसेवक बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना भाजपने उभे केले नाही. आम्ही कोणाला बोललो नाहीत. बंडखोरीशी आमचा काही संबंध नाही. त्यांची लढाई ते लढत आहेत. याला उभे करा, त्याला पाडा, हा आमचा व्यवसाय नाही. बंडखोरीचा फायदा-तोटा कोणाला होईल. यामध्ये आम्हाला काही रस नसल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) सांगितले.

चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे शहरात आले होते. आकुर्डीत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, प्रदेश सचिव अमित गोरखे, भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, प्रवक्ते एकनाथ पवार, सचिन पटवर्धन, सदाशिव खाडे, माजी महापौर उषा ढोरे, नामदेव ढाके यावेळी उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले, दिवंगत आमदाराच्या कुटुंबातील उमेदवार असल्याने आणि आमदारकीचा सव्वा वर्षाचाच कालावधी असल्याने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीला विनंती केली. पण, त्यांनी मान्य केली नाही. चिंचवडची निवडणूक विकासाच्या मुद्यावर लढत आहोत. भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांच्या पाठिशी केंद्र, राज्यातील डबल इंजिनचे सरकार आहे. त्यामुळे चिंचवडच्या विकासाला गती येईल.

स्वत:चे चेहरे आरशात बघा

भाजप विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढत आहे. भाजपवर भ्रष्टाराचे आरोप करणाऱ्यांनी स्वत:चे चेहरे आरशात बघितले पाहिजेत. सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता अशी ज्यांची विचारधारा आहे. ते आमच्या विचारधारेशी बरोबरी करु शकत नाहीत. विरोधकांच्या आरोपात काही तथ्य नाही. ती विचारधारा आमची नाही. ती विचारधारा विरोधकांची आहे. सत्तेपासून पैसा आणि पैशातून सत्ता हे त्यांनी केले. त्यांच्या आरोपाला किती महत्व द्यायचे हे जनता ठरवेल.

विजय ऐतिहासिक असेल

शहर भाजपने एक लाखाच्या मतांच्या फरकाने भाजपचा विजय होईल असा दावा केला आहे. भाजपचे मताधिक्य किती असेल याबाबत विचारले असता ते म्हणाले, किती मतांनी निवडून येवू हे जनतेवर सोडले पाहिजे. केवळ ऐतिहासिक विजय होईल. एवढेच बावनकुळे यांनी सांगितले.

Related Stories

देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांचा एकाच गाडीतून प्रवास

Archana Banage

कोल्हापूर : ‘लाभांश’ला 31 मार्च 2021 उजाडणार!

Archana Banage

जिल्हा बँकेला 149 कोटी 22 लाख करपूर्व नफा

Patil_p

Kolhapur; राजर्षी शाहूंची जयंती लोकोत्सव म्हणून साजरा करणार

Abhijeet Khandekar

राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी रद्द करा; मुख्यमंत्री शिंदेंची राज्यपालांकडे मागणी

datta jadhav

…त्यामुळे गीते सारख्या लोकांच्या वक्तव्यांची दखल घेत नाही: संजय राऊत

Archana Banage
error: Content is protected !!