Tarun Bharat

येणाऱया लोकसभा निवडणुकीत भाजपा मोठय़ा विजयाच्या तयारीत

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा दावा

प्रतिनिधी/ धारबांदोडा

 भारत जागतिक महासत्ता व्हावा, आत्मनिर्भर बनावा व देशाची गरीबी नष्ट व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली आठ वर्षे सतत काम करीत आहेत. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी त्यांनी ध्यास घेतला आहे. जात पात धर्म याचे राजकारण न करता माणुसकी हाच खरा धर्म आहे. या दृष्टीने ते वाटचाल करीत आहेत. म्हणून देशात भाजपाची सत्ता कायम राहिली असून येणाऱया 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अजून मोठय़ा विजयाचा विक्रम नोंदविला जाणार आहे, असे मत भाजपचे केंद्रीय लघुउद्योगमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले.

कळसई दाभाळ येथील श्री सातेरी पिसानी मंदिरच्या सभागृहात आयोजित केलेल्या भाजपा कार्यकर्ता मार्गदर्शन सभेत ते बोलत होते. पक्षाने येणाऱया लोकसभा निवडणुकीची समिती जाहीर केले असून सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागले पाहिजे असे ते म्हणाले. काँग्रेस पक्षाने देशावर अनेक वर्षे राज्य केले मात्र त्यांना गरीबी दूर करता आली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येकाला स्वयंपूर्ण करण्यासाठी झटत असून प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये ध्येय, महत्त्वकांक्षा व अभ्यासूपणा असणे गरजेचे आहे. आपल्या पदाचा व पैशाचा गर्व कधीही करू नये, आपण पक्षाचा पदाधिकारी होतो तो स्वतःसाठी नसून लोकांना, समाजाला न्याय देण्यासाठी होत असतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे असे ते पुढे बोलताना म्हणाले.

पक्षासाठी दिवसाला किमान एक तास काम करा, पण ते अशा प्रकारे करा की रस्त्यावरून जाताना त्या कार्यकर्त्यांची ओळख ही इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांपेक्षा वेगळी असली पाहिजे. आमदार गणेश गावकर हे आपल्यापरीने काम करीत आहेत. त्यांच्या कामाची पावती म्हणून मतदारसंघात मते वाढवून देण्याचे काम प्रत्येक कार्यकर्त्याने केले पाहिजे असे सांगून 2024 सालाच्या निवडणुकीत दक्षीण गोव्याचा उमेदवार मोठय़ा मताधिक्क्याने निवडून येईल यासाठी आत्तापासून कामाला लागा असा सल्ला त्यांनी दिला. महाराष्ट्रात शिवसेना सपाट झालेले आहे. त्याचप्रमाणे देशातूनही काँग्रेस सपाट झाली पहिजे यासाठी कामाला लागा असे ते शेवटी म्हणाले.

व्यासपीठावर सावर्डेचे आमदार गणेश गावकर, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, दक्षिण गोव्याचे माजी खासदार ऍड. नरेंद्र सावईकर, भाजपा पक्षाचे सरचिटणीस दामू नाईक, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, किर्लपाल दाभाळच्या सरपंच रुक्मिणी गावकर, कुळेचे सरपंच गोविंद शिगावकर, मोलेचे सरपंच कपिल नाईक, साकोर्डाच्या सरपंच प्रिया खांडेपारकर आदी उपस्थित होते.

आमदार गणेश गावकर म्हणाले, नारायण राणे यांनी सर्व क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. जी जबाबदारी त्यांच्यावर पक्षाकडून सोपवली जाते, ती ते शंभर टक्के पार पाडतात. अशाच प्रकारची जबाबदारी सावर्डे मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी पार पाडली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अभ्यासानुसार देशात 144 लोकसभा मतदारसंघ असे आहेत की तेथे भाजपाचे उमेदवार निवडून येऊ शकतात. त्यामध्ये दक्षिण गोवा मतदारसंघाचा समावेश आहे. म्हणून आतापर्यंत पक्षाने सावर्डे मतदारसंघावर दिलेली जबाबदारी कार्यकर्त्यांनी पार पाडली आहेत. कुठल्याही परिस्थतीत दक्षिण गोवा पुन्हा भाजपकडे आला पाहिजे. यासाठी कार्यकर्त्यांनी सावर्डे मतदारसंघाबरोबरच इतर ठिकाणी जबाबदारीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

खासदार विनय तेंडुलकर म्हणाले, विधानसभा निवडणुकीत आमदार गणेश गावकर यांना कार्यकर्त्यांच्या जोरावर मोठय़ा मताधिक्क्याने विजय मिळाला. त्याचप्रमाणे सावर्डे मतदारसंघतून लोकसभा निवडणुकीत मोठे मताधिक्क्य मिळाले पाहिजे आणि ते निश्चितच आम्ही देऊ असेही त्यांनी नमूद केले. सावर्डे भाजपा मंडळ अध्यक्ष विलास देसाई यांनी स्वागत केले. मच्छिंद्र देसाई यांनी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन तर मोहन गावकर यांनी आभार मानले.

 बैठकीला विविध पंचायतीचे उपसरपंच, पंचसदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

गणेशोत्सवाच्या तयारीसाठी वाढला भक्तांचा उत्साह!

Amit Kulkarni

विवाहाच्या दुसऱयाच दिवशी नववधुची आत्महत्या

Patil_p

रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सांगे येथे रास्ता रोको

Amit Kulkarni

मडगावात ‘बीग जी’ वर धाड, अवैध मद्य जप्त

Amit Kulkarni

श्रीवनदेवी मुकोबा देवस्थानचा वर्धापनदिन सोहळा आजपासून

Amit Kulkarni

शापोरा किल्ल्याची दुरुस्ती करणार

Amit Kulkarni