तेलंगणात मुलीला देणार साथ ः जावईही स्थापन करणार पक्ष
वृत्तसंस्था/ हैदराबाद
आंधप्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांच्या मातोश्री विजयम्मा यांनी वायएसआर काँग्रेसचे मानद अध्यक्षपद सोडले आहे. त्यांनी स्वतःच्या मुलीला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या मुलीने तेलंगणात एक नवा पक्ष स्थापन केला आहे. तेलंगणात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे.
विजयम्मा यांच्या कन्येने तेलंगणामध्ये एक पक्ष स्थापन केल्यावर त्यांचे जगनमोहन यांच्याशी मतभेद झाले होते. शर्मिला रेड्डी यांनी वायएसआर तेलंगणा पक्षाची घोषणा केली होती. जगनमोहन हे स्वतःच्या बहिणीच्या तेलंगणाच्या राजकारणातील प्रवेशाच्या विरोधात होते. वाएसआर तेलंगणा या पक्षाच्या स्थापनेवेळी विजयम्मा यांनी स्वतःच्या मुलीला शुभेच्छा दिल्या होत्या.
जगनमोहन रेड्डी यांचे पिता वायएसआर रेड्डी यांची शुक्रवारी 73 वी जयंती होती. यानिमित्त जगमोहन यांनी अविभाजित आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी तसेच मातोश्री देखील उपस्थित होत्या.
यावेळी शर्मिला यांचे पती अनिल कुमार उपस्थित नव्हते. अनिल यांनी अलिकडेच आंध्रप्रदेशात एक नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याचे संकेत दिले आहेत. विशाखापट्टणममध्ये मागास, वर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्याकांच्या विविध समुहांच्या नेत्यांच्या गाठीभेटी अनिल कुमार यांनी घेतल्या होत्या.
वायएस विजयलक्ष्मी या विजयम्मा या नावाने ओळखल्या जातात. सप्टेंबर 2009 मध्ये त्यांनी पती वायएसआर यांच्या मृत्युमुळे रिक्त झालेल्या मतदारसंघात पोटनिवडणूक लढवत विजय मिळविला होता. 2014 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली होती, परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला होता. तेव्हापासून त्या निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहिल्या होत्या.