आयपीएस अधिकाऱयांचे केले जातेय खच्चीकरण
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमध्ये आयएएस आणि आयपीएस अधिकाऱयांमधील संघर्षाच्या अनेक कथा समोर येत आहेत. वरिष्ठ आयएएस अधिकारी के.के. पाठक यांच्यानंतर आता आयपीएस विकास वैभव आणि होमगार्डच्या महासंचालक शोभा अहोतकर यांच्यातील वाद रंगू लागला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी याप्रकरणी आयपीएस अधिकारी वैभव यांना फटकारले होते. वैभव यांच्या बचावार्थ आता भाजप सरसावला आहे. नितीश कुमार हे आयपीएस अधिकाऱयांचे खच्चीकरण करत असल्याचा आरोप भाजप नेते सुशील कुमार मोदी यांनी रविवारी केला आहे. राजदशी हातमिळविणी केल्यावर नितीश कुमार हे सातत्याने पोलीस अधिकाऱयांचे खच्चीकरण करण्याची भूमिका स्वीकारत आहेत. व्यवस्थेमुळे त्रस्त पोलीस महानिरीक्षक विकास वैभव यांना जाहीर स्वरुपात फटकारणे आणि आमदार-मंत्र्यांना अपमानित करणारे आयएएस अधिकारी के.के. पाठक यांना संरक्षण देण्याची कृती चुकीचा संदेश देणारी आहे. नितीश सरकारमध्ये कार्यक्षम अधिकाऱयांचा छळ केला जात असल्याचा दावा मोदी यांनी केला आहे.
आयपीएस अमित लोढा यांच्या कार्यशैलीने लोक आनंदी होते, त्यांच्यावर एक वेबसीरिजही तयार करण्यात आली. अशा स्थितीत त्यांचे कौतुक करण्याऐवजी सरकारकडून लोढा यांना निलंबित करण्याची कारवाई हाती घेण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱयाची मनोस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता. वरिष्ठ आयपीएस अधिकाऱयांमधील संघर्ष जाहीर होणे प्रशासनावरील मुख्यमंत्र्यांची पकड सुटल्याचा संकेत देत असल्याचा दावा मोदी यांनी केला आहे.