एसआयटी चौकशीचा आदेश, मृतदेह सापडलेल्या गेस्ट हाऊसला जमावाने लावली आग
वृत्तसंस्था/ डेहराडून
उत्तराखंडमधील अंकिता भंडारी हत्या प्रकरणी ज्येष्ठ भाजप नेते आणि माजी मंत्री विनोद आर्य यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. त्यांचे बंधू अंकित आर्य यांचीही हकालपट्टी करण्यात आली आहे. विनोद आर्य यांचा पुत्र पुलकित याच्यावर अंकिता भंडारी यांची हत्या केल्याचा आरोप असून त्याला शुक्रवारीच अटक करण्यात आली आहे. त्याच्या रिसॉर्टच्याजवळ तिचा मृतदेह सापडला होता.
अंकिता भंडारी यांचा मृतदेह सापडल्यानंतर संतप्त जमावाने संबंधित रिसॉर्टला आग लावल्याचे वृत्त आहे. तसेच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी या हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास दल (एसआयटी) स्थापन केले जाईल, अशी घोषणा केली आहे. अंकिता भंडारी या 18 सप्टेंबरपासून बेपत्ता होत्या. 23 सप्टेंबरला त्यांचा मृतदेह पुलकित आर्य यांच्या रिसॉर्टजवळ सापडला होता. त्या या रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होत्या.
गैरकृत्य करण्याचा दबाव
अंकिता भंडारी यांच्यावर रिसॉर्टमध्ये येणाऱया अतिथींना ‘विशेष सेवा’ पुरविण्याचा आग्रह केला जात होता, असा आरोप होत आहे. त्यांना गैरकृत्ये करण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यांनी असे करण्यास नकार दिल्याने त्यांची हत्या करण्यात आली आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पुलकित आर्य याने त्याच्यावरील आरोप फेटाळले असून हत्येशी कोणताही संबंध नसल्याचे प्रतिपादन केले आहे. एसआयटी प्रमुख डीआयजी पी. रेणुकादेवी यांच्याकडे या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे सोपविण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली.
कठोर कारवाई करणार
पुलकित आर्य याच्यासमवेत आणखी तीन आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. रिसॉर्टचे क्यवस्थापन बघणाऱया अधिकाऱयांचाही यात समावेश आहे. दोषींना कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल, असे प्रतिपादन उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी केले आहे. न्यायप्रक्रिया वेगवान करून लवकरात लवकर न्याय दिला जाईल, असेही धामी यांनी या प्रकरणी स्पष्ट केले.
रिसॉर्ट उद्ध्वस्त
शनिवारी सकाळी दोनशे लोकांच्या जमावाने पुलकित आर्य यांच्या रिसॉर्टला आग लावली. त्यात रिसॉर्टची हानी झाली. दुपारी उत्तराखंड सरकारने आदेश काढून हे रिसॉर्ट बुलडोझर लावून पूर्णतः उद्ध्वस्त केले. त्याचप्रमाणे स्थानिक पटवारी (भूमी लेखाधिकारी) आणि रेव्हेन्यू पोलीस इन्स्पेक्टर यांनाही निलंबित करण्यात आले आहे. या पोलीस अधिकाऱयाने अंकिता आर्य बेपत्ता झाल्यानंतर प्रकरण नोंदवून घेण्यास नकार दिला होता.
राजकीय पडसाद
पुलकित आर्य याचा बंधू अंकित आर्य हा इतर मागासवर्गीय आयोगाच्या उपाध्यक्षपदी कार्यरत होता. त्यालाही या पदावरून डच्चू देण्यात आला आहे. या प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटत असून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नावालाही उरलेली नसल्याचा आरोप प्रमुख विरोधी पक्ष असणाऱया काँग्रेसने केला आहे. पुलकित आर्य याने पोलिसांसमोर आपल्या अपराधाची कबुली दिल्याचेही बोलले जात आहे. या कबुलीच्या आधारावरच अंकिताचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आल्याचे सांगितले जात आहे. उत्तराखंड राज्य आपत्ती निवारण दलाने अंकिता भंडारी यांचा मृतदेह शोधण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती.