ऑनलाईन टीम / तरुण भारत :
BJP MLA Laxman Jagtap passed away पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे आज सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. पुण्यातील खासगी रुग्णालयात उचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
लक्ष्मण जगताप मागील काही महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. मध्यंतरी अमेरिकेहून मागवलेल्या इंजेक्शनमुळे जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. पण, दीपावलीनंतर पुन्हा त्यांची प्रकृती खालावत गेली. प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान, आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. जून महिन्यात झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या वेळी लक्ष्मण जगताप यांचे एक मत भाजपासाठी बहुमोल ठरले होते. आजारी असतानाही मुंबईला रुग्णवाहिकेतून येऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
अधिक वाचा : ‘सीए’चा अभ्यासक्रम बदलणार
लक्ष्मण जगताप 1992 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर नगरसेवकपदी निवडून आले. 1993-94 मध्ये ते महापालिका स्थायी समिती सभापती होते. 1997 च्या निवडणुकीतही ते नगरसेवकपदी निवडून आले. सलग दहा वर्षे त्यांनी पिंपळे गुरवचे प्रतिनिधित्व केले. 1998 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. 19 डिसेंबर 2000 ते 13 मार्च 2002 या कालावधीत त्यांनी पिंपरी-चिंचवडचे महापौरपद भुषविले. मात्र, 2003-04 मध्ये त्यांनी बंडखोरी करत विधान परिषदेची निवडणूक अपक्ष लढवून विजय मिळवला. 2014 मध्ये भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवून ते विजयी झाले होते.