ऑनलाईन/टीम तरुण भारत
Lumpy Skin Disease : जयपूरमध्ये आज गेहलोत सरकारविरोधात भाजप निदर्शने करत आहे. निदर्शने करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांनी विधानसभेत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोर्चादरम्यान भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. या निदर्शनात राजस्थान भाजपचे अध्यक्ष सतीश पुनियाही उपस्थित होते. लम्पी स्किनमुळे गायींचा मृत्यू झाल्याचा मुद्दा उपस्थित करून भाजपने राजस्थानच्या काँग्रेस सरकारला घेरले आहे.
भाजपने या आंदोलनाची तयारी सोमवारीच केली होती. यासाठी सोमवारी भाजपने बैठक देखील घेतली. यावेळी बैठकीत पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते विधानसभेच्या दिशेने कूच करतील, असा निर्णय घेण्यात आला. यासोबतच पक्षाचे आमदार विधानसभेत इतर मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहेत.
याशिवाय कृषी, पशुसंवर्धन या मुद्द्यावरूनही गेहलोत सरकारला घेरण्याची तयारी भाजपने केली आहे. याबाबत भाजपचे आमदार वासुदेव देवनानी म्हणाले की, राज्य सरकार केंद्र सरकारला लम्पीला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्यास सांगत आहे, परंतु राज्य सरकार स्वत: ही आपत्ती घोषित करत नाही. राज्य सरकारला आपल्या जबाबदारीपासून पळ काढायचा आहे, कारण त्यापूर्वी कोरोनाच्या काळातही ते राज्यातील जनतेला सांभाळू शकत नव्हते आणि आता त्यांना गायीही सांभाळता येत नाहीत.