आठव्या वर्षपूर्तीनिमित्त विविध स्थानी कार्यक्रमांचे आयोजन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गुरुवारी केंद्रातील भाजप-रालोआ सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशात विविध स्थानी कार्यक्रमांचे आयोजन भाजप कार्यकर्त्यांनी केले आहे. 26 मे 2014 या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या सरकारची स्थापना झाली होती. त्यानंतर 2019 मध्ये सलग दुसऱयांदा सरकारला बहुमत मिळाले.
या आठ वर्षांच्या काळात पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. तसेच अनेक अभिनव सामाजिक योजनांचाही प्रारंभ केला आहे. गरीबांसाठी जनधन योजना, उज्ज्वला योजना, शेतकऱयांसाठी किसान सन्मान योजना, शौचालय योजना, आरोग्य विमा योजना, सडक योजना, गरीबांसाठी कोरोना काळात विनामूल्य धान्य योजना अशा अनेक योजना लागू करण्यात आल्या आहेत. या सरकारच्या पहिल्या कार्यकाळात निश्चलनीकरण आणि वस्तू-सेवा कर योजनेचे महत्वपूर्ण निर्णयही घेण्यात आले होते.
विशेष अभियान चालविणार
भाजपने आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सज्जता चालविली असून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ज्या जागांवर भाजपचे उमेदवार दुसऱया किंवा तिसऱया क्रमांकावर होते त्या जागांसाठी विशेष अभियान सुरु करण्यात येणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत या जागांवर भाजपची कामगिरी अधिक चांगली व्हावी, यासाठी या अभियानाद्वारे प्रयत्न करण्यात येणार आहेत. अशा एकंदर 144 जागा आहेत. याशिवाय गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या जागाही पुन्हा जिंकण्यासाठी आतापासूनच प्रयत्न केले जाणार आहेत.
जनसंपर्क अभियान होणार
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेत बुधवारी भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पुढील लोकसभा निवडणुकीसंबंधी पक्षाची रणनीती तयार करण्यात आली आहे. ज्या मतदान केंद्रांमध्ये पक्ष कमजोर आहे, तेथे यावेळी अधिक लक्ष दिले जाणार आहे. 30 मे पासून 15 जून पर्यंत सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सरकारची कामगिरी लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी जनसंपर्क अभियान होणार आहे.
81 खासदारांना तिकिटे नाहीत ?
आगामी लोकसभा निवडणुकीत सलग तिसऱयांदा विजयी होण्यासाठी भाजपने रणनीती सज्ज केली असून 70 वर्षांवरील नेत्यांना तिकिट न देण्याचा निर्णय घेतला आहे, असे वृत्त आहे. मात्र, या वृत्ताला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. ज्यांचा जन्म 1954 च्या आधी झालेला आहे, त्या खासदारांना यावेळी तिकिटे दिली जाणार नाहीत, असे मानण्यात येत आहे. तथापि, हे अनधिकृत वृत्त असून अनेकांनी त्यावर शंका व्यक्त केली आहे. पक्षाने या संबंधी अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. 81 खासदारांना यावेळी तिकिट दिले न जाण्याची शक्यता आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र यासंबंधी स्पष्टता नाही. 2024 पर्यंत भाजपचे 25 टक्के खासदार 70 वर्षांपेक्षा अधिक वयाचे होणार आहेत.