चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपने पुन्हा एकदा बाजी मारत चिंचवडचा गड कायम राखला आहे. या निवडणुकीमध्ये भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी 36,168 मतांनी राष्ट्रवादीचे नाना काटे यांना पराभवाची धूळ चारली. अश्विनी जगताप यांना 1,35,434 मते मिळाली. तर नाना काटे 99,343 इतकी मते घेत दुसऱ्या क्रमांकावर होते. पोटनिवडणुकीमध्ये अपक्ष बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी 44,082 इतकी मते घेतली.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 26 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. या निवडणुकीत 50.47 टक्के मतदानाची नोंद झाली. चिंचवडमध्ये एकूण 5 लाख 68 हजार 954 मतदार आहेत. त्यापैकी 2 लाख 87 हजार 145 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला होता. भाजप, राष्ट्रवादीसह अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याने मतांचे त्रिभाजन झाले. नेमकी हीच गोष्ट भाजपच्या पथ्यावर पडली .या निवडणुकीमध्ये जगताप आणि काटे या दोघांमध्ये खऱ्या अर्थाने लढत झालेली पाहायला मिळाली. पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत अश्विनी जगताप यांनी मतांची आघाडी कायम ठेवली. 30 व्या फेरीत त्यांच्या मतांची आघाडी 27 हजार 775 होती.
अधिक वाचा : भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार; कसब्यात काँग्रेसचे धंगेकर विजयी
दरम्यान, चिंचवड मतदार संघामध्ये 347 पोस्टल मतदानाद्वारे मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवण्यात आला. यामध्ये दोन सैनिक, तसेच दिव्यांग, शासकीय, पोलीस कर्मचारी यांचा समावेश होता. पोस्टल मतदानाद्वारे जगताप यांना 169, काटे यांना 92 तर कलाटे यांना 30 मते मिळाली. तब्बल 45 पोस्टल मते अवैध ठरली.