बी. एल. संतोष यांच्याकडे अध्यक्षत्व
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2024 मध्ये होणारी लोकसभा निवडणूक आणि राज्यांच्या विधानसभा निवडणुकीवरून भाजपने राज्य प्रभारींची बैठक बोलाविली आहे. ही बैठक 27 सप्टेंबर रोजी होणार आहे. या बैठकीचे अध्यक्षत्व राष्ट्रीय संघटन महामंत्री बी. एल. संतोष यांच्याकडे असणार आहे. या बैठकीत भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा देखील सहभागी होऊ शकतात. तर बैठकीपूर्वी सर्व प्रभारी स्वतःकडे जबाबदारी असलेल्या राज्यांचा दौरा करत आहेत.
राज्यांमधील संघटन बळकट करण्यावरून भाजप अत्यंत सतर्क आहे. याचमुळे पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व वारंवार विविध राज्यांचा दौरा करत आहे. यानुसार भाजपाध्यक्ष नड्डा यांनी तामिळनाडूचा दौरा केला आहे. ते दोन दिवसांच्या दौऱयानिमित्त मदुराई येथे पोहोचले आहेत. राज्यातील नेत्यांसोबत संघटनात्मक बैठक करत विविध क्षेत्रांमधील दिग्गज व्यक्तींच्या गाठीभेटी नड्डा घेत आहेत.
तत्पूर्वी राष्ट्रीय संघटन महामंत्री बी. एल. संतोष यांनी हिमाचल प्रदेशातील शिमल्याचा दौरा केला होता. या दौऱयादरम्यान त्यांनी भाजप कार्यकर्त्यांकडून फिडबॅक घेत तो पक्षनेतृत्वाला कळविला होता.