मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
प्रतिनिधी/ पणजी
भाजपच्या नवीन कार्यालयात माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नावाने संशोधन केंद्र सुरु करणार असल्याची माहिती मुख्य़मंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
भाजपच्या सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या गणेशचतुर्थी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे वितरण करण्याच्या कार्यक्रमात सावंत बोलत होते. पणजी येथील मिनेझिस ब्रागांझा हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला.
ते पुढे म्हणाले की, भाजप हा राजकीय क्षेत्रातच काम करतो, असे नाही. गेल्या 5 वर्षात भाजपने वेगवेगळे विभाग (सुमारे 15 ते 16) स्थापन केले असून त्या विभागातर्फे विविध प्रकारचे कार्यक्रम आखण्यात येतात. सांस्कृतिक विभागातर्फे गणेशचतुर्थी स्पर्धा आखण्यात आली होती. त्यातील विजेत्यांना कार्यक्रमासाठी पाचारण करण्यात आले होते. त्या सर्वांचे अभिनंदन करतो, असे सावंत यांनी नमूद केले.
भाजपच्या विविध विभागांनी आता पुढे जाऊन संशोधनाकडे वळावे. कार्यक्रम आखावेत तसेच शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावे. अंत्योदय पद्धतीने काम करावे. भाजपच्या नवीन कार्यालयात त्या संशोधनासाठी केंद्र सुरु करण्यात येईल. त्याला पर्रीकरांचे नाव देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. गोवा प्रदेश भाजपचे अध्यक्ष सदानंद तानावडे व इतर पदाधिकारी त्यावेळी उपस्थित होते.