हिडन कॅमेऱयाचे फुटेज असल्याचा दावा
वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी एक व्हिडिओ जारी करत भाजपवर आमदारांच्या खरेदीचे प्रयत्न चालविल्याचा आरोप केला आहे. पत्रकार परिषद घेत केसीआर यांनी एका मागोमाग एक व्हिडिओ सादर केले आहेत. दिल्लीतील दलालांनी आमच्या पक्षातील (तेलंगणा राष्ट्र समिती) चार आमदारांना लाच देण्याचा प्रयत्न केला आहे. यासंबंधी माझ्याकड हिडन कॅमेऱयाचे एक तासाहून अधिक कालावधीचे फुटेज असल्याचा दावा केसीआर यांनी केला आहे.
देशाला वाचविण्याची विनंती मी न्यायपालिकेला करत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना हे व्हिडिओ पाठविणार आहे. तेलंगणा, आंध्रप्रदेश, दिल्ली आणि राजस्थानातील सरकार पाडविण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री केसीआर यांनी केला आहे. केसीआर यांनी सादर केलेला व्हिडिओ मागील आठवडय़ातील असल्याचे सांगण्यात येत आहे. तेलंगणातील एका फार्महाउसमधील हे फुटेज असल्याचे समजते.
आमच्या आमदारांनी लाच घेतली नाही, त्यांना ऑपरेशन कमळविषयी पोलिसांना माहिती दिली आहे. आमचे सरकार पाडविण्यासाठी भाजप आमच्या 20-30 आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपने आतापर्यंत 8 राज्यांमध्ये सरकारे पाडविली आहेत. भाजप आता अन्य 4 राज्यांमधील सरकार पाडविण्याच्या प्रयत्नात आहे. भाजपच्या 24 जणांची एक टीम विविध राज्यांमध्ये आमदारांना स्वतःच्या जाळय़ात ओढून निवडून आलेल्या सरकारांवर बुलडोझर चालविण्याचे काम करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
केसीआर यांचे हे आरोप भाजपने फेटाळून लावले आहेत. या आरोपांची कहाणी मुख्यमंत्र्यांनीच लिहिली असून तेच याचे दिग्दर्शन करत आहेत. भाडेतत्वावरील अभिनेत्यांसोबत व्हिडिओ रेकॉर्डिंग करून हे नाटय़ रचण्यात आल्याचा प्रतिआरोप केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी केला आहे.
पंतप्रधान हेच मोठे पद
तेलंगणावर कब्जा करण्यासंबंधी वक्तव्ये भाजपचे नेते करत आहेत. भाजपच्या या आमिषांच्या राजकारणाला आम्ही बळी पडणार नाही. ही क्रूरता का अशी विचारणा मी भाजप नेत्यांना करू इच्छितो. भाजपला आणखी किती सत्तास्थाने हवी आहेत? भाजप यापूर्वी दोनवेळा केंद्रात निवडून आला आहे, राज्यांमधील अन्य पक्षांचे सरकार पाडविण्याचा प्रयत्न भाजप का करत आहे असे प्रश्नार्थक विधान केसीआर यांनी केले आहे.