वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सत्तारुढ भाजप सध्या देशातील सर्वाधिक देणगी प्राप्त करणारा पक्ष ठरला आहे. 2020-21 मध्ये भाजपला 477.5 कोटी रुपयांहून अधिक देणगी मिळाली आहे. तर याच कालावधीत देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेसला 74.50 कोटी रुपयांपेक्षा अधिक देणगी प्राप्त झाली आहे. आकडेवारी पाहिल्यास भाजपला काँग्रेसच्या तुलनेत 6 पट अधिक देणगी मिळाली आहे.
निवडणूक आयोगाने मंगळवारी दोन्ही पक्षांना मिळालेल्या देणगीसंबंधी अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार भाजपला विविध संस्था, निवडणूक ट्रस्ट आणि व्यक्तींकडून 477 कोटी रुपये मिळाले आहेत. भाजपने 14 मार्च रोजी निवडणूक आयोगासमोर 2020-21 या आर्थिक वर्षात प्राप्त देणगीचा तपशील सादर केला होता. तर काँग्रेसकडून आयोगाला सोपविण्यात आलेल्या अहवालानुसार त्या पक्षाला 74.50 कोटी रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे.