प्रतिनिधी/कोल्हापूर
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिला तर प्रदेश भाजपा राज्यसभेची तिसरी जागा लढवेलही आणि जिंकेलही, असा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी केला.
राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा एक उमेदवार निवडून येऊ शकत असताना शिवसेना सहाव्या जागेसाठी दुसरा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवत असल्याबद्दल विचारले असता चंद्रकांतदादा म्हणाले की, भाजपाचे विधानसभेतील संख्याबळ ध्यानात घेता राज्यसभा निवडणुकीत पक्षाचे दोन उमेदवार सहज निवडून येतात. त्याखेरीज अतिरिक्त मतांच्या जोरावर भाजप तिसरी जागा लढवून जिंकू शकतो. या निवडणुकीच्या बाबतीत पक्षाचे केंद्रीय नेतृत्व निर्णय घेत असल्याने त्यांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई होईल. शिवसेनेने या निवडणुकीत काय करावे हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु, राज्यसभा निवडणुकीत प्राधान्यक्रमाच्या मतदानाच्या पद्धतीमुळे दोन उमेदवार लढविण्याच्या प्रयत्नात कधी कधी मूळ उमेदवार पराभूत होतो, हे ध्यानात घ्यावे, असे ते म्हणाले.
केंद्रीय तपास यंत्रणांचे स्वतंत्रपणे काम
शिवसेना नेते व परिवहनमंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानावर ईडीने मारलेल्या छाप्याविषयी प्रतिक्रिया विचारली असता चंद्रकांतदादा म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणा संविधानाच्या चौकटीत स्वतंत्रपणे काम करत आहेत. त्याविषयी मी टिप्पणी करणे योग्य होणार नाही. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाई होत नसल्याचे पाहून जयश्री पाटील उच्च न्यायालयात गेल्या. त्यांच्या अर्जाच्या आधारावर उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिला व कारवाई झाली. न्यायालयाचा दरवाजा सर्वांसाठी खुला आहे. केंद्रीय यंत्रणांकडून होणाऱया कारवाईबाबत शिवसेनेला काही गैर वाटत असेल तर त्यांनी न्यायालयाकडे दाद मागावी, असा सल्लाही चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला.