Tarun Bharat

फोंडा नगरपालिकेवर भाजपाची सत्ता

नगराध्यक्ष रितेश नाईक, तर अर्चना डांगी उपनगराध्यक्ष

प्रतिनिधी /फोंडा

फोंडा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी भाजपाचे रितेश रवी नाईक तर उपनगराध्यक्षपदी अर्चना डांगी यांची बिनविरोध निवड झाली आहे. रितेश हे फोंडय़ाचे आमदार व कृषीमंत्री रवी नाईक यांचे पुत्र आहेत. दोन्ही पदे जिंकून भाजपाने फोंडा पालिकेवर सत्ता प्रस्तापित केली आहे.

नगराध्यक्ष गिताली तळावलीकर व उपनगराध्यक्ष जया सावंत यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव 9 विरुद्ध शून्य मतानी संमत झाला होता. काल बुधवारी झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी रितेश नाईक व प्रदीप उर्फ झालू नाईक यांनी तर उपनगराध्यक्षपदासाठी अर्चना डांगी, चंद्रकला नाईक व सीमा फर्नांडिस यांनी अर्ज दाखल केले होते. शेवटच्या क्षणी प्रदीप नाईक यांच्यासह चंद्रकला नाईक व सीमा फर्नांडिस यांनी आपले अर्ज मागे घेतल्याने दोन्ही पदांवर बिनविरोध निवड झाली. निर्वाचन अधिकारी म्हणून केपे तालुक्याचे उपजिल्हाधिकारी निलेश धायगोडकर यांनी काम पाहिले. मुख्याधिकारी योगिराज गोसावी यांनी त्यांना साहाय्य केले. यावेळी सर्व पंधराही नगरसेवक उपस्थित होते. रितेश नाईक हे फोंडा पालिकेला लाभलेले या कार्यकाळातील सहावे नगराध्यक्ष आहेत.

फोंडय़ाच्या विकासासाठी मतभेद बाजूला ठेवा : रवी नाईक

फोंडय़ाचे आमदार व कृषीमंत्री रवी नाईक यांनी नूतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांचे अभिनंदन केले. फोंडा पालिकेतील प्रलंबित विकासकामे झटपट मार्गी लावताना जनतेला तत्पर सेवा व महसूल वाढीवर भर देण्याचा सल्ला त्यांनी दिला. विकासकामे राबविताना राजकीय मतभेद बाजूला ठेवा व सर्व प्रभागांना समान न्याय द्या. सरकारकडून फोंडा पालिकेला आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल असेही त्यांनी सांगितले.

प्रलंबित विकासकामे मार्गी लावणार : रितेश नाईक

नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर रितेश नाईक यांनी पालिका मंडळाची लवकरच आढावा बैठक घेऊन प्रलंबित विकासकामे मार्गी लावणार असल्याचे सांगितले. फोंडा मार्केट प्रकल्प. गोल्डन ज्युबिली प्रकल्प यासह इतर नियोजित विकासकामांना गती देण्यात येईल. तसेच जनतेच्या कामात विलंब होणार नाही, यासाठी आपण विशेष लक्ष घालणार आहे. तालुक्यातील चारही मंत्र्यांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.

दुसऱयांना मोहीम फत्ते

गेल्या वर्षी मे महिन्यात रितेश नाईक यांची नगराध्यक्ष म्हणून निवड निश्चित झाली होती. मात्र ऐन वेळी भाजपाचे फोंडा गटाध्यक्ष असलेल्या शांताराम कोलवेकर यांनी बंड करुन त्यांच्या विरोधात अर्ज भरला होता. कोलवेकर यांना मगो व इतर पक्षातील नगरसेवकांचा पाठिंबा लाभल्याने रितेश नाईक यांची संधी हुकली होती. मात्र यावेळी त्यांनी चोख मोर्चेबांधणी करीत पूर्ण तयारीनिशी डावपेच टाकले व अखेर त्यांचे मनसुबे पूर्ण झाले.

Related Stories

मडगाव पालिकेत डेटा ऑपरेटरच्या जागा भरताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

Amit Kulkarni

शिरोड्यात शिमगोत्सव चतुर्दशी उत्सव अलोट गर्दीत उत्साहात

Amit Kulkarni

पेडणे पोलिसांची तेरेखोल नदीपाञात पोरस्कडे येथे बेकायदेशीर रेती उत्खनन करणाऱयावर कारवाई

Amit Kulkarni

राज्यातील खनिज वाहतूक 13 जूननंतर बंद

tarunbharat

मॉक ड्रील दरम्यान एटीएस कमांडो जखमी

Patil_p

दीड लाखाची चोरी करणाऱया चोरटय़ास 24 तासात अटक

Amit Kulkarni