मैनपुरीत मुलायम यांच्या सुनेला देणारी उमेदवारी
वृत्तसंस्था / लखनौ
उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाचा सर्वात मजबूत गड म्हणून ओळखला जाणारा मैनपुरी लोकसभा मतदारसंघाकरता भाजपने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सपचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. या मतदारसंघात विजय मिळवून अखिलेश यादव हे मुलायम यांचा राजकीय वारसा कायम ठेवू पाहत आहेत. तर सपचा हा बालेकिल्ला सर करण्यासाठी भाजप या मतदारसंघात मुलायम यांची सून अपर्णा यादवला उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे.
मुलायम यांचे पुत्र प्रतीक यांची पत्नी अपर्णा यादव यांना पोटनिवडणुकीच्या मैदानात भाजप उतरविणार असल्याची चर्चा आहे. नेताजी मुलायम सिंह यादव यांचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या मैनपुरीच्या पोटनिवडणुकीत त्यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाऊ शकते. यादव समुदायाची मते आणि मुलायम यादव कुटुंबाच्या सदस्य असल्याने अपर्णा यादव यांना भाजपकडून संधी दिली जाऊ शकते. इटावाचे माजी खासदार रघुराज सिंह शाक्य, आमदार ममतेश शाक्य, प्रेमसिंह शाक्य, राहुल राठौड यांच्यासह प्रदीप चौहान यांचेही नाव उमेदवारीकरता चर्चेत आहे.
ओबीसी मतदारसंख्या अधिक
मैनपुरी मतदारसंघात यादव, शाक्य, पाल, लोधी यासारख्या ओबीसी समुदायांच्या मतदारांची संख्या अधिक आहे. भाजपने मैनपुरी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानी भाजपची बैठक पार पडली असून यात उमेदवाराच्या नावावर चर्चा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेताजी मुलायम सिंह यादवांचा आदर करायचे. याचमुळे मैनपुरीमध्ये मोदींनी मुलायम यांच्या विरोधात कधीच प्रचार केला नव्हता. परंतु स्थिती आता बदलली आहे. पोटनिवडणुकीत भाजप आता पूर्ण शक्तिनिशी उतरणार असल्याचे एका नेत्याने म्हटले आहे.
5 डिसेंबरला मतदान
मैनपुरी लोकसभा मतदारसंघातील नामांकन प्रक्रिया 10 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. 5 डिसेंबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 8 डिसेंबरला मतगणनेनंतर निकाल जाहीर केला जाईल. याचमुळे भाजप आणि समाजवादी पक्षाने निवडणुकीच्या तयारीला अंतिम स्वरुप देण्यास सुरुवात केली आहे. मुलायम यादवांच्या निधनानंतर भाजपने सपच्या स्थानिक नेत्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. हे नेते केवळ मुलायम सिंह यांच्यामुळेच सपशी जोडले गेले होते. अशा स्थितीत या वरिष्ठ नेत्यांना स्वतःसोबत आणण्याच्या रणनीतीवर भाजपकडून काम होत आहे.