ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. कसब्यात दुहेरी तर चिंचवडमध्ये तिरंगी लढत होत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने या निवडणुकांसाठी पूर्ण ताकदीने प्रचार केला होता. दोन्ही निवडणुका चुरशीच्या होणार असून, यामध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कसब्याची निवडणूक भाजपसाठी अधिक प्रतिष्ठेची ठरणार आहे. त्यामुळे मतदारांचा कौल कुणाला हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कसबा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. गेले 30 वर्षे कसब्यावर भाजपचे वर्चस्व राहिले आहे. पण, यावेळेस काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजपाच्या हेमंत रासने यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे. धंगेकर मागील 25 वर्षांपासून कसबा मतदारसंघातील विविध प्रभागांमधून निवडून आले आहेत. त्यामुळे कसब्यातील काही भाग सोडला तर बाकी सगळय़ा प्रभागामध्ये रविंद्र धंगेकरांची चांगली पकड आहे. त्यामुळे कसब्यात हेमंत रासने विरुद्ध रविंद्र धंगेकर अशी जोरदार लढत पहायला मिळणार आहे.
कसब्यात भाजपच्या रासने यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांपासून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अन्य मंत्री प्रचारात उतरले होते. मुख्यमंत्री या निवडणुकीसाठी तीन दिवस पुण्यात ठाण मांडून होते. शिवाय मनसेनेही रासने यांना पाठींबा दिला आहे. भाजपने कधी नव्हे ते एवढे नेते प्रचारात उतरवले होते. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला होता.त्यामुळे आज मतदार कोणाच्या पारड्यात किती मतं टाकणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.