वाहतूक नियमांचे पालन करत नसल्याने घटना
वृत्तसंस्था/ एक्रोन
अमेरिकेत ओहायो प्रांतातील एक्रोन शहरात एका कृष्णवर्णीय व्यक्ती पोलिसांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडला आहे. मृत व्यक्तीचे नाव जेलँड वॉकर असून तो वाहतूक नियमांचे पालन करत नव्हता. पोलिसांनी रोखल्यावर त्याने पलायनाचा प्रयत्न केला होता. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
पोलीस अधिकाऱयांनी जेलँड वॉकरला वाहनातून बाहेर येण्याची सूचना केली होती, परंतु तो वाहनातच बसून राहिल्याने पोलिसांनी त्याला ओढून बाहेर काढले. परंतु त्यानंतर त्याने पलायनाचा प्रयत्न केला, त्याचा पाठलाग करताना पोलिसांनी त्याच्या दिशेने गोळीबार केला होता. या गोळीबारामुळे त्याचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेच्या अनेक प्रांतांमध्ये जेलँड वॉकरच्या हत्येच्या विरोधात निदर्शने केली जात आहेत. ‘जस्टिस फॉर जेलँड’ आणि ‘ब्लॅक लाइव्स मॅटर’ असे संदेश असलेले फलक लोकांनी या निदर्शनांमध्ये झळकविले आहेत. यापूर्वी 25 मे 2020 रोजी मिनेपोलिस येथील पोलीस पथकाने जॉर्ज फ्लॉयडची हत्या केली होती. जॉर्जच्या हत्येमुळे अमेरिकेत मोठा गदारोळ झाला होता.