रिक्षाचालकासह तांदूळ ताब्यात : अन्न-नागरी पुरवठा खात्याच्या निरीक्षकांची कारवाई
वार्ताहर /उचगाव
रेशन तांदळाचा काळाबाजार सुरू असल्याचा सुगावा लागताच अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या निरीक्षकांनी धाड टाकून अंदाजे तीन क्विंटल तांदूळ जप्त केला. रेशन तांदूळ जमा करणाऱया इसमासह रिक्षा ताब्यात घेतल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली.
बेळगावच्या पश्चिम भागातील अनेक गावांतून रेशन तांदळाचा काळाबाजार जोरात सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. गावागावातून ऑटो रिक्षा घेऊन सदर व्यक्ती घरोघरी जाऊन रेशनचा तांदूळ आहे का? अशी विचारणा करून दहा ते पंधरा रुपये किलो दराने विकत घेत असल्याचे अनेकवेळेला निदर्शनास येत होते.
मात्र गुरुवारी रेशनचा तांदूळ विकत घेण्यासाठी गावात रिक्षा फिरत असल्याचा सुगावा अन्न व नागरी पुरवठा खात्याला लागताच खात्याच्या निरीक्षकांसह चौघांनी उचगावात येऊन धाड टाकली. रेशनचा तांदूळ जमा करताना एकाला रंगेहाथ पकडले. त्याची तातडीने चौकशी करून रिक्षा व चालकाला जमा केलेल्या तांदळासह ताब्यात घेतले.